विद्यार्थ्यासाठी ५० हजार रुपये खर्च करत असूनही खासगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांचा दर्जा सुमार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विद्यार्थ्यासाठी ५० हजार रुपये खर्च करत असूनही खासगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांचा दर्जा सुमार

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 21 Dec 2015
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थी गळतीवर प्रजा फाउंडेशनने सोमवारी श्वेतपत्रिका जाहीर केली. गळतीसाठी प्रशासनाकडून होणारे प्रयत्न तोकडे असल्याचे सांगणाऱ्या प्रजाच्या अहवालात नगरसेवकांची उदासीनताही समोर आली आहे. पालिका प्रशासन दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ५० हजार ५३४ रुपये खर्च करत असूनही खासगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांचा दर्जा सुमार असल्याचा ठपका ‘प्रजा’ने ठेवला आहे.

वर्षभरात पालिका शाळांतील विद्यार्थी गळतीवर केवळ पाच नगरसेवकांनी चार प्रश्न विचारल्याची धक्कादायक माहिती या वेळी समोर आली. प्रजाने माहिती अधिकारात उघडकीस आणलेल्या माहितीनुसार, पालिकेतील २२७ नगरसेवकांपैकी सुमारे १६६ नगरसेवकांनी एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत शिक्षण समस्येसंबंधी एकही प्रश्न विचारलेला नाही. यावरून मनपा नगरसेवकांची शिक्षणाबद्दलची गंभीरता स्पष्ट होते. शिक्षण समिती सदस्यांबाबतही तीच परिस्थिती दिसते. सदस्यांनी २०१३-१४ मध्ये ५५ आणि २०१४-१५ मध्ये केवळ ५८ प्रश्न विचारले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे एकूण २२७ नगरसेवकांनी मिळून वर्षभरात केवळ ६१ प्रश्न विचारले आहेत.
चौथ्या इयत्तेतील पालिकेच्या केवळ १.६ टक्के व सातवीच्या ०.३ टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश मिळाले आहे. याउलट खासगी शाळेतील अनुक्रमे ९.६ टक्के व ८.८ टक्के विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याची माहिती प्रजाने दिली. 
पालिकेच्या पहिली इयत्तेतून सरासरी १४ विद्यार्थी पाचवी इयत्तेपर्यंतही पोहोचत नाहीत. २०१०-११ साली पहिली इयतेत्त ६२ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यातील २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात पाचवी इयत्ता गाठणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ ५३ हजार ९६२ होती. धक्कादायक बाब म्हणजे सातवीतून आठवीपर्यंत सरासरी ३९ विद्यार्थीच पोहोचतात. २०१३-१४ साली सातवी इयत्तेत ४८ हजार ४२५ विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली. मात्र त्यातील केवळ १८ हजार ९९१ विद्यार्थीच आठवी इयत्तेत गेल्याचे प्रजाने सांगितले.
पालिकेचे इंग्रजी माध्यम वगळता इतर सात विविध माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. गेल्या पाच वर्षांत मराठी माध्यम शाळांतील विद्यार्थीसंख्या १९.५० टक्क्यांनी घटली आहे. याउलट इंग्रजी माध्यम शाळांतील विद्यार्थीसंख्येत १४.७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ आणि तेलगू माध्यमातील शाळांमधील विद्यार्थीसंख्येतही सातत्याने घट झाली आहे.
मुंबईतील शाळांची आकडेवारी -
शाळेचा प्रकार संख्या विद्यार्थी शिक्षक
पालिका १,२५२ ३,९१,७७२ १२,४९६
खासगी अनुदानित ४३६ १,५३,०५८ ३,६००
खा. विनाअनुदानित ६६५ ३,१५,८७७ ६,८७६
अनोंदणीकृत ८० १४,४०१ ४०९

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages