मुंबई - लोकलमधून पडून प्रवाशांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 2) रेल्वेला फटकारले. निदान पुढच्या पिढीला तरी हा त्रास होऊ देऊ नका, असा टोला खंडपीठाने लगावला.
उपनगरी रेल्वेच्या डब्यांमध्ये ज्येष्ठांसाठी अतिशय कमी राखीव आसने आहेत. तिथपर्यंत जाणेही त्यांना शक्य होत नाही. याबाबतच्या याचिकेची सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्यासमोर झाली. त्या वेळी कोपरनजीक रेल्वेतून पडून नुकत्याच एका तरुणाच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेवरही न्यायालयाने मत व्यक्त केले. या तरुणाला कोणीतरी वाचवायलाच हवे होते. झाले ते चांगले झाले नाही, असे न्यायालयाने सांगितले. गर्दी असलेल्या लोकलच्या दरवाजात लटकत प्रवास करू नये. त्याचे परिणाम काय होतात, याबाबत प्रबोधन करा. त्यासाठी लघुपट-जाहिराती दाखवा. गाड्यांची दारे बंद करण्याबाबत पाहा; अन्यथा सरळ आसने नसलेल्या गाड्या तयार करा. डब्यांमधील गर्दी वाढत असताना त्यांची सोय बघितली पाहिजे, असे खंडपीठाने सांगितले. तुमच्याकडे (रेल्वे) दूरदृष्टी व नियोजन नाही, हे सध्याची व्यवस्था पाहून स्पष्ट दिसते. गर्दीमुळे सर्व व्यवस्थाच कोलमडल्याचे जाणवते. प्रवासी संख्या वाढणार असेल तर तयारी हवी. त्यांना तशा सोयीही दिल्या पाहिजेत. अशाप्रकारे प्रवासी पडून मृत्युमुखी पडणार नाहीत अशीच व्यवस्था करा. तुम्ही सेवाकर वाढवता, पण प्रवाशांना सोयीच देत नाही. निदान पुढच्या पिढीला तरी हा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. 50 वर्षांचे नियोजन करा, तुमची सध्याची व्यवस्था हतबलताच दाखवते, असाही टोला न्यायालयाने रेल्वेला लगावला.

No comments:
Post a Comment