सोहराबुद्दीन प्रकरणाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सोहराबुद्दीन प्रकरणाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 27 Dec 2015   
गुजरातमधील गॅंगस्टर सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाच्या खटल्यातून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना दोषमुक्त करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. 

दिल्लीतील हर्ष माडर यांनी केलेल्या या याचिकेत सोहराबुद्दीनसह तुलसी प्रजापती आणि कौसर बी यांच्या हत्येचा उल्लेख आहे. सोहराबुद्दीनचा बनावट चकमकीत मृत्यू हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील सत्यता पडताळणे गरजेचे आहे. मात्र सत्र न्यायालयाने त्यापूर्वीच शहा यांना दोषमुक्त केले, असे माडर यांनी याचिकेत म्हटले आहे. गंभीर गुन्ह्यातील एखादा आरोपी सुटत असेल आणि त्याविरोधात कोणीही याचिका करीत असेल तर न्यायालयाने त्याची दखल घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. याचिकादार या खटल्यातील तक्रारदार किंवा पीडित नाही या कारणावरून त्याची याचिका फेटाळू नये, असेही याचिकादाराचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी अशाच प्रकारची याचिका नामंजूर केली होती. संबंधित याचिकादार या खटल्यात पीडित किंवा तक्रारदार नसल्यामुळे याचिका करण्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. सोहराबुद्दीनच्या भावानेही शहा यांच्या दोषमुक्ततेविरोधात याचिका केली होती. मात्र नंतर त्याने माघार घेतली. सोहराबुद्दीनची हत्या गुजरातमध्ये झाली होती. त्याचा खटला येथील न्यायालयामध्ये वर्ग केला आहे. सीबीआय न्यायालयात शहा यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोषमुक्ततेसाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो मान्य करून त्यांना दोषमुक्त केले. विशेष म्हणजे सीबीआयने याविरोधात अद्याप अपील केलेले नाही. न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी याचिकेवरील सुनावणी जानेवारीत ठेवली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages