मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मालाड टेकडी जलाशया बाजूच्या अनेक ठिकाणी तुटलेल्या संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीकरणाचे काम हाती घेतले आहे. येथील भिंत वारंवार तोडली जात असल्यामुळे महानगरपालिकेने संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी कंत्राटदाराची निवडही करण्यात आली असली तरी यामुळे महानगरपालिकेला करोडो रुपयांचे नुकसान होणार असल्याची चर्चा आहे.
मालाड टेकडी जलाशयचे क्षेत्रफळ एकूण ४० एकर आहे. त्यातील ५ एकर क्षेत्रफळावर जलाशयाच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. तर दोन ठिकाणी जलबोगदे आहेत. पश्चिम उपनगरातील दैनंदिन पाणीपुरवठय़ाच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असून याच्या सभोवताली बांधण्यात आलेली दगडी भिंत समाजकंटकांकडून तोडण्यात आली आहे. या भिंतीच्या चारही बाजूला झोपडपट्टी असल्यामुळे लोकांचा वावर या तुटलेल्या भिंतीमधून होत असल्यामुळे अखेर ही दगडी भिंत पाडून त्याठिकाणी सिमेंट काँक्रिटची भिंत बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या ४० एकर जागेवरील सभोवताली भिंत बांधण्यासाठी २१ कोटी ६५ लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या २३ कोटींच्या तुलनेत कंत्राटदाराने ६ टक्के कमी दराने बोली लावत हे काम मिळवले आहे.
त्यामुळे याठिकाणी सहा टक्के कमी बोली लावत काम मिळवल्यामुळे महापालिकेचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत असल्याची तक्रारच महापालिकेतील नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे तसेच अतिरिक्त आयुक्तांकडे केली. मात्र, त्यानंतरही महापालिकेने त्याच कंत्राटदाराला पुन्हा काम देत हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. त्यामुळे महापालिका कोटय़वधी रुपयांचे नुकसान सहन करून हा प्रस्ताव मंजूर करते की फेटाळते याकडे सर्वाचे लक्ष आहे. मुंबई महानगरपालिकेकडून रस्ते गटारे बांधणे अशी विविध कामे केली जातात. पावसाळी गटारे बांधण्यासाठी कंत्राटदार ३० ते ३६ कमी टक्के दराने बोली लावून कामे मिळवतात. मात्र मालाड टेकडी जलाशयाच्या सरंक्षक भिंतीसाठी फक्त ६ टक्के कमी दराने बोली लावून काम मिळवले आहे. मार्केट मध्ये सिमेंट व लोखंडचा भाव कमी झालेला असतानाही एवढय़ा कमी दराने बोली लावत काम मिळवल्यामुळे सुमारे सात ते आठ कोटी रुपयांचे महापालिकेचे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment