दाभोलकर प्रकरणाचा तपास अहवाल देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दाभोलकर प्रकरणाचा तपास अहवाल देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Share This
मुंबई- शीना बोरा हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकारी नीना सिंह यांना नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास अहवाल देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. याप्रकरणी सीबीआय पथकाचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत; पण आरोपी सापडू शकलेले नाहीत, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले.
दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या नातलगांनी या विषयावर सादर केलेल्या याचिकांची सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. व्ही. एल. अचलिया यांच्यासमोर झाली. पानसरे हत्याप्रकरणी एसआयटीने तपासात विशेष प्रगती केली नसल्याने त्यांनी पुन्हा प्रगती अहवाल द्यावा, असेही खंडपीठाने सांगितले. 


दाभोलकर हत्येच्या तपासाबाबत सीबीआयने दिलेला गोपनीय अहवाल खंडपीठाने वाचला. सीबीआय प्रयत्नांची शर्थ करीत आहे. ते निश्‍चितच प्रगतिपथावर आहेत, त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत असेच या अहवालावरून दिसते, असे मत न्यायालयाने मांडले. सीबीआयचे अतिरिक्त अधीक्षक दर्जाचे अधिकारी पुण्यातून हा तपास करीत आहेत. त्यांना केवळ पाच पोलिस अधिकाऱ्यांचे सहकार्य आहे. या प्रकरणाची पाळेमुळे गोवा, कर्नाटक आदी राज्यांतही असतील. त्यामुळे या तुलनेत कनिष्ठ अधिकाऱ्यांना बहुधा हा तपास करणे जमणार नाही. अशा स्थितीत सीबीआयचे विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी अर्जदारांच्या वतीने अभय नेवगी यांनी केली; मात्र शीना बोरा हत्या प्रकरणावर देखरेख ठेवणाऱ्या सीबीआयच्या सहसंचालक नीना गुप्ता या प्रकरणावरही देखरेख ठेवून आहेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना अन्य राज्यांचेही सहकार्य मिळत आहे, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. त्यामुळे खंडपीठाने गुप्ता यांना तपास अहवाल देण्यास सांगितले.

पानसरे हत्याप्रकरणात 15 दिवसांत आरोपपत्र सादर करायचे आहे. तिघांची साक्ष दंडाधिकाऱ्यांसमोर घेण्यात आली आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले, पण केवळ समीर गायकवाड या एकाच आरोपीविरुद्ध पोलिस काय आरोपपत्र सादर करणार, असे अर्जदारांनी विचारले. या प्रकरणाचा सूत्रधार कोण, गायकवाडचे साथीदार कोण, हे पोलिसांना अजूनही शोधता आलेले नाही. हे प्रकरण हाताबाहेर जात आहे. असे झाले तर हे प्रकरण असेच मृत होऊन जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणी तपासात विशेष प्रगती झालेली नाही, असे खंडपीठ म्हणाले. दोन्ही प्रकरणांत पुढील अहवाल देण्यास 7 जानेवारीपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

राजकीय दडपण?
दाभोलकर प्रकरणाचा तपास मंद गतीने सुरू आहे. यामागे सीबीआयचा थंडपणा असेल किंवा त्यांच्यावर राजकीय दडपण असेल, असाही आरोप नेवगी यांनी या वेळी केला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages