मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 17 Dec 2015
टॅब वाटप योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून या संपुर्ण योजनेची महापालिका आयुक्तांनी चौकशी करावी, अन्यथा न्यायालयात दाद मागू, असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब देण्याबाबतच्या योजनेत स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-भा.ज.पाची खाबुगिरी या प्रकरणाद्वारे उघड झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना व्हिडिओकॉन कंपनीचे टॅब देण्याची योजना महापालिकाने आखली होती. प्रत्यक्षात मात्र व्हिडीअोकॉन ऐवजी बोल्ड या नोंदणीकृत नसलेल्या कंपनीचे टॅब मुलांना वाटले गेले. बोल्डच्या या टॅबची किंमत फक्त अडिच हजार रुपये असून महापालिकेने ते तब्बल चार हजार आठशे रुपयांना विकत घेतले आहेत. आतापर्यंत तब्बल एकवीस हजार टॅबचे वाटप महापालिकांच्या विविध शाळांमधून करण्यात आले आहे. टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीकडून हे टॅब विकत घेतल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात मात्र संबंधित कंपनीकडून टॅबचे वितरणच झाले नसल्याची बाब समोर आली असून टॅबची गुणवत्ताही सुमार आहे. टॅबचे सॉफ्टवेअरही अद्ययावत नसून एकदा चार्ज केल्यानंतर केवळ दोन तास पुरेल इतकीच क्षमता या टॅबची असल्याने विद्यार्थ्यांना या टॅबचा कोणताही उपयोग नाही, असे सांगत एकूणच या संपुर्ण योजनेतच कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे उघड होत असल्याचा दावा अहिर यांनी केला. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा पुरवण्याऐवजी ही योजना रेटली जात असताना आम्ही या योजनेला विरोध केला होता. कारण या योजनेत भ्रष्टाचार होणार याची आम्हाला खात्री होती. म्हणूनच आता या योजनेची चौकशी आयुक्तांनी करावी अन्यथा आपण मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचीही आमची तयारी असून शासकीय यंत्रणेने आपल्या मागणीची दखल न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधात न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले.
भाजपाची चुप्पी संशयास्पद
काही दिवसांपुर्वी महापालिका आयुक्तांनी केलेल्या चौकशीद्वारे समोर आलेल्या नालेसफाई घोटाळ्याच्या वेळी अगदी उच्चारवाने शिवसेनेवर टीका करणारे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार एवढा मोठा टॅबचा घोटाळा समोर आल्यानंतरही गप्प का, असा खोचक सवाल अहिर यांनी केला. एरव्ही कुठल्याही बारिकसारिक मुद्द्यावर थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत उठसुट चौकशीची मागणी करणार्या शेलार यांची या मुद्द्यावरची चुप्पी संशयास्पद असल्याचेही ते म्हणाले, असा टोलाही त्यांनी लगावला.
No comments:
Post a Comment