मुंबई / www.jpnnews.in - युतीचा ‘रिमोट कंट्रोल‘ कोणाच्या हातात यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा चांगलाच रंगला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हातात असलेला "रिमोट‘ माझ्या हातात दिला आहे, असे ठाकरे यांनी म्हणताच फडणवीस यांनीही हा "रिमोट कंट्रोल‘ उद्धव यांनी माझ्या हातात थोड्यावेळापूर्वी दिला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरकारचा "रिमोट कंट्रोल‘ कोणाच्या हातात याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
निमित्त होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसला नवा रंग देऊन तिचे नाव शिवशाही केल्याने वाद रंगला असतानाच फडणवीस आणि ठाकरे या दोघांनी एकमेकांना चिमटेही काढण्याची संधी सोडली नाही. ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्राला नव्या आरामशीर बसगाड्या प्रदान करणे हे अभिनंदनीय काम आहे. परिवहनमंत्री या नात्याने दिवाकर रावते यांनी अशा प्रकारची सेवा नागरिकांना पुरवणे ही आनंदाची बाब आहे. जनतेच्या हिताच्या योजना अशाच सुरू व्हाव्यात. सरकार प्रश्न सोडविण्यासाठी असते. युती शासनाच्या काळात कारभाराचा रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हातात होता. लोकोपयोगी योजना, तसेच सरकारचा कारभार यावर ते लक्ष ठेवून असत. योग्य सूचना करीत. त्यांचा रिमोट कंट्रोल आता माझ्या हातात आहे.‘‘
उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी "रिमोट कंट्रोल‘चा मुद्दा उचलून धरला. ते म्हणाले, ‘बसगाड्यांच्या योजनांचे उद्घाटन करताना उद्धव ठाकरे यांनी रिमोट कंट्रोल त्यांच्या हातातून माझ्या हाती थोड्याच वेळापूर्वी दिला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनीही आणि माझ्या सहकाऱ्यांनी हे पाहिले आहेच. त्यामुळे महाराष्ट्रातील नव्या युती सरकारचा रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे माझ्याही हाती आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी ही जाणीव ठेवावी आणि लोकांच्या प्रगतीची कामे वेगाने मार्गी लावावीत.‘‘
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकामुळे, तसेच मुंबई महापालिकेतील नालासफाई गैरव्यवहारातील तरतुदींमुळे भाजप-शिवसेना संबंधांत काहीसा तणाव निर्माण झाला असतानाच बाळासाहेबांच्या जयंती दिनानिमित्त रिमोट कंट्रोल कुणाचा हा वाद सुरू झाला आहे. आमच्या पाठिंब्यामुळे तुमचे सरकार आहे अशी जाणीव ठाकरे यांनी करून देताच फडणवीसांनीही दिलेले उत्तर याचीच आज राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.