महापौर बंगल्याचा आग्रह शिवसेना सोडणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2016

महापौर बंगल्याचा आग्रह शिवसेना सोडणार

मुंबई / www.jpnnews.in - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भाजप राजकीयदृष्ट्या हिरवा कंदील दाखवत असला, तरी लालफितीत आणि न्यायालयाच्या कचाट्यात अडकण्याची व्यवस्थाही केली जात आहे. शिवसेनेने भाजपचा हा कावा ओळखून न्यायालयात फेऱ्या मारण्याऐवजी महापौर बंगल्याचा आग्रह सोडून दादरमध्येच पर्यायी योग्य जागा मिळवून महापालिका निवडणुकीपूर्वी बाळासाहेबांचे स्मारक उभारले जावे यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. 
महापालिका निवडणुकीपूर्वी बाळासाहेबांचे स्मारक उभे राहणे हे शिवसेनेसाठी आवश्‍यक आहे. मात्र, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा निश्‍चित करताना त्याठिकाणी पोचण्याच्या मार्गावर काटे देखील पसरलेले असतील याची काळजी भाजपने घेतलेली आहे. त्यामुळे भाजपच्या जाळ्यात अडकून बाळासाहेबांचे स्मारक रखडू द्यायचे, की त्यावर सामोपचाराने पर्यायी मार्ग स्वीकारायचा, यावर शिवसेना विचार करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना सांगितले, की महापौर बंगल्याची जागा मुंबई महापालिकेची आहे. राज्य सरकारने न्यायालयात आपली बाजू योग्य पद्धतीने मांडली तर त्यात काही अवघड नाही. पण, स्मारकाची घोषणा तीन महिन्यांपूर्वी होऊनही मंत्रालयात कागदही हलत नाही. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काही किंमत आहे का?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनास तीन वर्षे झाल्यानंतरही त्यांचे यथोचित स्मारक उभे राहू शकलेले नाही. दरम्यान, भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नावाने भव्य उद्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने परळी येथे आठ एकर जागेवर उभे राहिलेले "गोपीनाथ गड‘ हे स्मारकही अलीकडचेच. मात्र, बाळासाहेबांचे मुंबईत स्मारक उभे राहण्यासाठी होत असलेली दिरंगाई शिवसेना नेते आणि शिवसैनिकांसाठीही भळभळती जखम ठरली आहे.
स्मारकासाठी मुख्यमंत्री लवकरच बैठक घेणार आहेत. स्मारक लालफितीमध्ये अडकलेले आहे; पण हे सरकारी काम असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त करून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाराजी व्यक्‍त केली.

स्मारकाचा विषय - रावतेंची प्रश्‍नाला बगल 
परिवहन खात्यामार्फत बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने विविध योजनांची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी स्मारकाचा विषय निघाल्यानंतर रावतेंनी पत्रकारांना टाळत "दुसरा प्रश्‍न विचारा‘ असे बोलत अप्रत्यक्षपणे सरकारच्या कामाबाबत नाराजी व्यक्‍त केली.

Post Bottom Ad