मुंबई : बेस्टचे अधिकारीच परदेशी अभ्यास दौऱ्यांवर जात असल्याने बेस्ट समिती सदस्य नाराज झाले आहेत़. बेस्टच्या अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी समिती सदस्यांनाही मिळावी, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली़ मात्र यासाठी राज्य व केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असल्याचे सांगत महाव्यवस्थापकांनी समिती सदस्यांच्या परदेश दौऱ्याची हवा काढून घेतली.
परदेशातील योजनांचा अभ्यास करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात येत असते़ या अभ्यास दौऱ्यातून अधिकारी काहीही शिकून आले, तरी त्याची अंमलबजावणी मुंबईत अपवादानेच होते़ त्यामुळे अशा टूर या शासकीय खर्चातील सहली ठरत असतात़ अशा या सहलींना जाण्याची संधी मिळत नसल्याने बेस्ट समिती सदस्य संतप्त झाले आहेत़. अशा दौऱ्याला सदस्यांना का पाठविण्यात येत नाही, याचा जाब सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत विचारला़ परदेशातून शिकून आल्यानंतर किती प्रकल्प येथे आणले, याचा अहवाल सदस्यांनी मागविला़ मात्र सदस्यांना पाठविण्यास आपली काही हरकत नाही़ पण आधी राज्य आणि केंद्र सरकारची परवानगी घ्या असे महाव्यवस्थापकांनी आवाहन करताच बेस्ट समिती सदस्यांची बोलती बंद झाली.
No comments:
Post a Comment