बचत गटांना यापुढे खिचडीचे कंत्राट नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2016

बचत गटांना यापुढे खिचडीचे कंत्राट नाही

मुंबई / www.jpnnews.in - निकृष्ट दर्जाची खिचडी पुरविणाऱ्या महिला बचत गटांना खिचडीच्या कंत्राटात जून 2016 पासून मुदतवाढ न देण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. 22) शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच यापुढे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनासाठी निविदा मागविण्याचा निर्णयही घेण्यात आला. 

गोवंडीच्या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून झालेल्या विषबाधेचे आजच्या शिक्षण समितीमध्ये चांगलेच पडसाद उमटले. शिवनाथ दराडे यांनी याबाबतचा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. महिला बचत गटांनी पुरवलेल्या खिचडीत अळ्या, मेलेली झुरळे, उंदरांच्या लेंड्या सापडून त्याबाबत सतत वाद होत आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाची खिचडी पुरविणाऱ्या बचत गटांना वारंवार मुदतवाढ का देण्यात यावी, असा प्रश्‍नही त्यांनी केला. बचत गट सकाळी 7 वाजता खिचडी बनवतात आणि ती गरम असतानाच डब्यात बंद करून शाळांमध्ये पाठवली जाते. दुपारच्या अधिवेशनाची खिचडीही सकाळीच पाठवली जाते. त्यामुळे डब्यातल्या खिचडीला अनेकदा आंबूस वास येतो. किचन अस्वच्छ असल्यामुळे खिचडीत अळ्या, झुरळे सापडत असल्याचेही त्यांनी सांगितले. खिचडी बनवणाऱ्या किचनची तपासणी करा. वरचेवर छापे टाका. मध्यवर्ती स्वयपांकगृह आणा आदी मागण्या प्रियतमा सावंत यांनी केल्या. मध्यान्ह भोजनात विविधता हवी; पण ती अशा स्वरूपाची नसावी, असा मुद्दा उपस्थित करत यामिनी जाधव यांनी गरीब विद्यार्थ्यांची थट्टा करू नका, अशी सूचनाही केली. मुंबई वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यवर्ती स्वयंपाकगृहाला परवानगी आहे; मात्र राज्य सरकारने पालिकेला ही परवानगी दिलेली नसून, राज्य सरकार स्वत: मुंबईत मध्यवर्ती स्वयंपाकगृह बनणार असल्याची माहिती उपायुक्त रणजित ढाकणे यांनी दिली. महिला बचत गट हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत खिचडीचा पुरवठा करतील. त्यानंतर मध्यवर्ती स्वयंपाकगृह तयार होईपर्यंत निविदा काढल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली. 

Post Bottom Ad