‘बेस्ट मेगा सिटी अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल महापौरांनी केले मुंबईकरांसह पालिका प्रशासनाचे अभिनंदन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘बेस्ट मेगा सिटी अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल महापौरांनी केले मुंबईकरांसह पालिका प्रशासनाचे अभिनंदन

Share This


मुंबई / www.JPNnews.in 
केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशभरातील शहरे व महानगरे यांचे स्वच्छता अभियानांतर्गत नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बृहन्मुंबई महानगरपालिका अव्वल ठरली आहे. याबरोबरच देशभरातील सर्व शहरांमध्येही मुंबईने १० व्या क्रमांकाचा बहुमान पटकाविला आहे. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह पालिकेतील सर्व पदाधिकारी, गटनेते यांनी प्रशासनाचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्र सरकारच्या वतीने काही महिन्यांपूर्वी देशातील सर्व महानगरे व शहरांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने ‘स्वच्छता सर्वेक्षण श्रेणी’ बाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात बृहन्मुंबई महानगरपालिकेला ‘बेस्ट मेगा सिटी अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच देशातील सर्व शहरांमध्ये मुंबईला १० व्या क्रमांकाचा बहुमान लाभला आहे. गेल्यावर्षी १४७ व्या क्रमांकावर असणाऱया मुंबईने केवळ एका वर्षांतच हे दैदिप्यमान यश मिळविले आहे.

दिनांक १५ फेब्रुवारी, २०१६ रोजी दिल्ली येथे केंद्रिय नगरविकास मंत्री व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते ‘बेस्ट मेगा सिटी अवॉर्ड’ मुंबईच्या उप महापौर अलका केरकर व अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांनी स्वीकारला. बृहन्मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वांत मोठी  तसेच नागरी सेवा-सुविधा देण्याच्या दृष्टीनेसुद्धा अव्वल आहे. ‘स्वच्छ मुंबई – स्वच्छ भारत’ अभियानाला लोकप्रतिनिधींसह मुंबईकर नागरिक नि प्रशासनाने एक लोकचळवळ म्हणून गेल्या वर्षभरात राबविण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. अथक व अहोरात्र केलेल्या या कार्याबद्दल हा सन्मान बृहन्मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झाल्याचे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी नमूद केले आहे.

महापौर दालनात आज (दिनांक १६ फेब्रुवारी, २०१६) झालेल्या बैठकीत महापौर स्नेहल आंबेकर, उप महापौर  अलका केरकर, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे, भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोज कोटक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते संदीप देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी यावेळी प्रशासनाचे अभिनंदन व कौतुक केले. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे याही उपस्थित होत्या.      

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages