संगणकीय मराठी, बोली भाषेतील नाट्य स्पर्धा आणि उपक्रम सुरु करणार- विनोद तावडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संगणकीय मराठी, बोली भाषेतील नाट्य स्पर्धा आणि उपक्रम सुरु करणार- विनोद तावडे

Share This
मुंबई http://www.jpnnews.in दि. 22 : 
मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्याच्या दृष्टीने आगामी काळात संगणकीय मराठी, दलित ग्रामीण शब्दकोशांच्या पुढील आवृत्ती व सूची, शेतीकोश, परिभाषा कोश यांची निर्मिती करण्यात येणार असून बोली भाषेतील नाट्य स्पर्धा आयोजन करण्याबाबत सकारात्मक  विचार करण्यात येईल . तसेच  अमराठी भाषिकांमध्ये मराठी भाषेचे महत्त्व वाढविण्यासाठी भाषेमध्ये संगीताचा वापर करण्यात येईल, अशी माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.


विशेष म्हणजे राज्य मराठी विकास संस्थेच्या  नियामक मंडळाची आज झालेली बैठक तब्बल पाच वर्षांनंतर प्रथमच झाली, असेही तावडे यांनी सांगितले. राज्य मराठी विकास संस्थेच्या नवनिर्वाचित नियामक मंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मराठी भाषामंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीबाबत प्रसिध्दी माध्यमांना माहिती देताना तावडे यांनी सांगितले की, विकीपीडीयाच्या धर्तीवर संगणकीय मराठी भाषेचा विकास करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील बळीराजाच्या माहितीसाठी शेतीकोश तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.  त्याचपध्दतीने मराठीतील देवनागरी आणि मोडी लिपीचे प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य मराठी विकास संस्थेअंतर्गत होणा-या भविष्यातील प्रकल्पासाठी मराठी भाषा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात येणार आहे. भाषेचे जतन आणि संवर्धन करणे या उद्दीष्टाने राज्य मराठी विकास संस्था आपली वाटचाल करणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले.

राज्य मराठी विकास संस्थेअंतर्गत मराठी संकेतस्थळाची स्पर्धा, मराठी ग्रंथ सूचीमाला वस्त्रनिर्मीती माहिती कोश, वैज्ञानिक पुस्तकांचा अनुवाद आदी प्रकल्प अग्रक्रमाने हाती घेण्यात येणार आहेत. तसेच उच्च न्यायालयाच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून या संदर्भात मुख्यमंत्री लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी चर्चा करणार आहेत, असेही तावडे यांनी सांगितले.
मराठी भाषा जगली पाहिजे. ती सर्वमान्य झाली पाहिजे. त्यासाठी पूरक कार्यवाही करणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य मराठी विकास संस्थेनी मराठी भाषेच्या समृद्धीसाठी हाती घेतलेले प्रकल्प महत्त्वपूर्ण आहेत. या संस्थेच्या माध्यमातून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी जे वातावरण तयार करणे गरजेचे आहे ते निर्माण करता येईल. यासाठी या संस्थेला शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने मराठी भाषेच्या विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांनी यावेळी घेतला. यावेळी विविध सदस्यांनी मराठी भाषेच्या समृद्धीसाठी नव्याने करावयाच्या उपक्रमांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

या बैठकीला डॉ. शामा घोणसे, दीपक घैसास, राजेंद्र साहेबराव दहातोंडे, रेणू दांडेकर, अमर हबीब, विद्या गौरी टिळक, अनय जोगळेकर, भारत देगलूरकर, प्रा. सोनल कुलकर्णी, डॉ. रंजन गर्गे, नंदेश उमप, श्रीराम दांडेकर, कौशल इनामदार, शिवाजीराजे भोसले, रेखा दिघे आदी मान्यवर उपस्थित होते. ‍

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages