मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
देशी-विदेशी मद्यासाठी आता फक्त काचेच्या बाटल्या वापराव्या लागतील. त्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या किंवा टेट्रापॅकचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
प्लास्टिक अल्कोहोलमध्ये काही प्रमाणात विरघळत असल्याने प्लास्टिकच्या बाटलीत दारू ठेवल्यास त्याचे पिणाऱ्याच्या आरोग्यावर अधिक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्लास्टिकमधून दारू विकण्यास मनाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सादर झाली होती. या वेळी सरकारतर्फे वरील माहिती देणारा "जीआर‘ सादर करण्यात आला.
प्लास्टिकच्या बाटल्या हलक्या असल्याने त्यांची वाहतूक सहज करता येते. त्यांची तस्करी व चोरटी वाहतूकही करता येते, असाही अर्जदारांचा आक्षेप होता. प्लास्टिक नष्ट होत नसल्याने पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो, अशाही तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. याचा विचार करून वरील निर्णय घेतल्याचे सरकारने सांगितले. हा "जीआर‘ गृह विभागाने काढला असून, त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून केली जाईल. ही माहिती सरकारने दिल्यावर न्या. विद्यासागर कानडे व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढली.