हुतात्म्यांच्या वारसांना इंग्रजांच्या खब-यांचे वारसदार देशभक्ती शिकवणार का ? - अशोक चव्हाण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हुतात्म्यांच्या वारसांना इंग्रजांच्या खब-यांचे वारसदार देशभक्ती शिकवणार का ? - अशोक चव्हाण

Share This
मुंबई http://www.jpnnews.in 
आजी इंदिरा गांधी आणि वडिल राजीव गांधी यांच्या हौतात्म्याचा वारसा असणा-या राहुल गांधींना स्वातंत्र्य लढ्यातील इंग्रजांच्या खब-यांचे वारसदार देशभक्ती शिकवणार का, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.


खा. चव्हाण यांनी आज प्रदेश काँग्रेसचे कार्यालय गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशातील वर्तमान परिस्थितीवर चिंता व्यक्त करून यासाठी केंद्रातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारणीभूत असल्याचा हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रोहित वेमुला आणि जेएनयु प्रकरणात विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावरून भाजप व संघाने काँग्रेस व राहूल गांधींविरोधात अपप्रचार सुरू केला आहे. केंद्र सरकार आणि संघ हेच देशप्रेमी; या दोघांना विरोध करणारे इतर सर्व देशद्रोही, असे वातावरण देशात निर्माण केले जात आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मारेक-याची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यास समर्थन देणा-यांना राष्ट्रभक्तीवर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का, असा प्रश्न उपस्थित करून भाजप व संघांचा राष्ट्रवाद ढोंगी असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

राजकीय लाभासाठी भाजप देशातील सामाजिक सौहार्दाला तडा देत आहे. देशभरातील काँग्रेस नेत्यांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे. साहित्यिक, कलावंत, पत्रकार, विद्यार्थी अशा प्रत्येक घटकावर विद्यमान सरकारची दडपशाही सुरू आहे. संघाची मानसिकताच हुकूमशाही समर्थक असल्यामुळे राजस्थानातील भाजपचा आमदार जाहीरपणे राहुल गांधींना गोळ्या घालण्याची भाषा करतो. हे सारे चित्र अस्वस्थ करणारे असून, काँग्रेस पक्ष त्याचा वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवेल, असे अशोक चव्हाण पुढे म्हणाले.
पत्रकार परिषदेला वरिष्ठ प्रवक्ते हरिश रोग्ये, डॉ. राजू वाघमारे, अल नासिर झकेरिया आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages