Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

गोव्याच्या धर्तीवर कोकणचा विकास - मुख्यमंत्री

मुंबई - महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असलेल्या कोकणचा पर्यटन विकासाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केला. आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी घोषणांचा पाऊसच पाडला. कोकण पर्यटन हा जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करणारा विभाग ठरावा, यासाठी गोव्याच्या धर्तीवर कोकणचा विकास करणाऱ्या योजनांची घोषणा त्यांनी केली.

राज्यात पर्यटन विकास महामंडळ असले, तरी कोकणाची क्षमता व व्याप्ती पाहता स्वतंत्र पर्यटन मंडळ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यासाठी "आयएएस‘ दर्जाचा अधिकारीही नेमण्यात येईल, असे ते म्हणाले. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा पर्यटन विकासाचा 3055 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून, आशियाई बॅंकेच्या माध्यमातून तो राबवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

"स्वदेश दर्शन‘ कार्यक्रमाच्या अंतर्गत विजयदुर्ग, देवगड, मिठबाव, टेंबवली, शिरोळ, सागरेश्वर येथे पर्यटक निवास उभारण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. देशातला एकमेव "सी वर्ल्ड‘ प्रकल्प 1390 हेक्‍टर जमीन आवश्‍यक असल्याने संपादनाच्या अभावी रेंगाळला होता. मात्र आता केवळ 350 एकरातच हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, वर्षभरात या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. कोकणातले सागरीकिनारे, सुरक्षा, पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प गोवा पर्यटनाच्या धर्तीवर उभारण्यात येतील, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, कोकण पर्यटनाला चालना देणारे महोत्सव प्रभावीपणे राबविले जातील. त्यासाठी स्वतंत्र पर्यटन संचालनालय नव्याने सुरू करणार, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पर्यटकांसाठी रत्नागिरीचे विमानतळ विस्तारीत करण्याची परवानगी मिळाली असून कोस्ट गार्डच्या माध्यमातून विकास करण्यात येत आहे. लवकरच येथे रात्रीदेखील प्रवासी विमाने उतरू शकतील, असे ते म्हणाले.
"मेक इन इंडिया‘च्या माध्यमातून सात प्रमुख करारांपैकी सहा पर्यटन करार कोकणासाठी केल्याचे ते म्हणाले. कोकणात येणाऱ्या प्रत्येक फ्रुट पार्कला विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत, जैन समूहाच्या माध्यमातून आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्याचा करार झाल्याची माहिती त्यांनी दिली.

ग्रीन रिफायनरी महत्त्वाची 
कोकणात तीन पेट्रोलियम कंपन्यांची मिळून ग्रीन रिफायनरी उभारण्यात येणार आहे. ही देशातली सर्वांत मोठी रिफायनरी आहे. एक लाख कोटीच्या गुंतवणुकीतून एक लाख कोकणी तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आंबवडे गावाला 40 कोटी 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आंबवडे या गावाला 40 कोटी रुपये निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यामधून बाबासाहेबांचे जुने घर स्मारकात रूपांतरित करण्याचे काम करण्यात येईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणा 
- कोकण पर्यटन महामंडळासाठी स्वतंत्र सनदी अधिकारी नेमणार
- "स्वदेश दर्शना‘चा 82 कोटीचा आराखडा
- सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा 3055 कोटींचा प्रस्ताव
- वर्षभरात "सी वर्ल्ड‘चे काम
- पर्यटन संचालनालय नव्याने सुरू करणार
- रत्नागिरी विमानतळालाही चालना
- आंबवडे गावाला 40 कोटी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom