मुंबई : सांताक्रुझ पूर्वेकडील वाकोला येथे खासगी वॉटर टँकर्स विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडत, महापालिकेविरोधात आपला रोष व्यक्त केला. महापालिका भूमिगत जलवाहिनीतून खासगी टँकर्सला दररोज १ रुपया ३० पैसे प्रतिदराने दहा हजार लीटर्स पाणी पुरवते, असा आरोपही मनसेने आंदोलनाच्या वेळी केला.
मनसेने आंदोलनाच्या वेळी पाण्याने भरलेले आणि रिकामे खासगी वॉटर टँकर्स अडवले. आंदोलकांना पांगविण्यासाठी घटनास्थळी पोलीस दाखल झाले, परंतु जोपर्यंत पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर, यापुढे टँकर्सने पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले. दरम्यान, येथील रुग्णालय आणि पोलीस वसाहतीलाच पाणी दिले जाईल, अशी भूमिकाही मनसेने घेत, एकही खासगी वॉटर टँकर दिसला, तर पालिका कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या वेळी दिला. येथील शाखा अध्यक्ष रितेश देसाई, शशी सावंत, संतोष उपलकर, महिला विभाग अध्यक्ष सुगंधा भोगले, सुकन्या सावंत, रविना चव्हाण, अनंत साळे, मंगेश निगुडकर आणि पक्षाचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.


No comments:
Post a Comment