राज्यात भयंकर दुष्काळ पडला असताना मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकर नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची गळती आणि चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. महापालिका अधिकारी आणि ट्यान्कर लॉबीकडून पाण्याची चोरी करून नागरिकांची लुटमार सुरु आहे. या लुटमारीमधून मिळणारा पैसा अधिकारी आणि ट्यान्कर लॉबी गब्बर झाली आहे. मुंबईमध्येही पाण्याची कमी आहे. पाणीकपात सुरु आहे रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना महापलिका अधिकारी आणि बिल्डर यांनी मिळून फेल केली आहे. यामुळे दरवर्षी पाऊस पडेलच याची शक्यता कमी असल्याने महानगरपालिकेने मुंबईमध्ये पडणारे पाऊसाचे पाणी वाचवण्यासाठी हे पाणी धरणात न्यावे किंवा हे पाणी वापरता येईल अशी योजना बनवावी असे मागील आठवड्यातील लेखामध्ये लिहिले होते.
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपाची सत्ता गेले २३ - २४ वर्षे आहे. सोशल मिडीयाच्या प्रचारावर मोदी लाट निर्माण करून केंद्रात भाजपाचे सरकार आले या लाटेमध्ये शिवसेनेचेही उमेदवार जिंकू शकतील का अशी शंका असताना खासदार झेले आहेत. परंतू मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी पासून या दोन्ही मित्र पक्षात बिनसले आहे. दोन्ही मित्र पक्षांनी काडीमोड घेत वेग वेगळ्या निवडणुका लढवल्या. भाजपचा मुख्यमंत्री बनल्यावर शिवसेना विरोधी पक्षात बसली. भाजपाला लागणारे संख्याबळ कमी पडल्याने शिवसेनेचे २०-२२ आमदार गळाला लावले गेले. २० -२२ आमदार फुटणार म्हणजे शिवसेनेची नाचक्की होणार म्हणून सेनेने विरोधी पक्षातून थेट सरकार मध्ये उडी मारली आणि राज्यात भाजपा शिवसेनेचे सरकार आहे.
सरकार भाजपा आणि शिवसेनेचे असले तरी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे एकही संधी वायां घालवली जात नाही. महापालिकेत एकत्र सत्तेत मांडीला मांडी लावून बसायचे आणि एकमेका विरोधात आरोप प्रत्यारोप करत राहायचे प्रकार सुरु आहेत. मागील वर्षी मुंबईमधील नालेसफाई मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झाला. भाजपा आणि कॉंग्रेसने हा भ्रष्टाचार कागदपत्रांसह सिद्ध केला. आयुक्त अजोय मेहता यांना या प्रकरणी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्यास भाग पाडले आहे. या प्रकरणी शिवसेना नेहमी नालेसफाई योग्य प्रकारे झाल्याचे सांगत असल्याने सेनेची नाचक्की झाली आहे.
शिवसनेच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी मागील वर्षी आयुक्तांना पत्र लिहून रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार केली होती. यावर चौकशी करण्यात येत असली तरी अद्याप हा अहवाल अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. यामुळे आयुक्त भाजपाचे काम त्वरित करतात शिवसेनेचे आयुक्त ऐकतही नाहीत असा संदेश सत्ताधारी शिवसेनेला दिला जात आहे. यावरून सध्या तरी राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने शिवसेनेला जितके कोंडीत पकडता येईल तितके कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मुंबई महानगरपालिकेत भाजपाचा महापौर बसवण्यासाठी सेनेला लगाम घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याचाच एक भाग म्हणून भाजपाचे खासदार किरीट सोमय्या, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेवून मुंबईमधील पाण्याच्या चोरी आणि गळतीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पालिका आयुक्ताची या नेत्यांनी दोन वेग वेगळ्या भेटी घेताना पाणीचोरीची कागदपत्रांसह आकडेवारी सादर करत पाणी चोरी त्वरित थांबण्याची आणि दोषी लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशी मागणी करताना सत्ताधारी शिवसेनेकडे इतके वर्षे महापौर, स्थायी अध्यक्ष पद आहे त्यांच्याकडे अधिकार असताना त्यांनी हि पाणी चोरी का थांबवली नाही असा प्रश्न उपस्थित करत शिवसनेने पाणी गळती आणि पाणी चोरी बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन भाजपाने दिले आहे.
महानगर पालिकेच्या बेस्ट उपक्रमावर ४ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे बेस्टला विविध सवलती मिळाव्यात म्हणून बेस्ट समिती शिव्सेच्या ताब्यात असताना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली. या बैठकीत शिवसेनेचे मंत्री नेते बेस्ट समिती सदस्य आणि अध्यक्ष होते. यावेळी बेस्टला आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली असता आर्थिक मदत करण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला होता. आता असेच प्रयत्न बेस्ट समिती भाजपाकडे आल्यावर केले जात आहेत. बेस्टला राज्य सरकारकडून आर्थिक निधी दिला जाणार आहे असे संकेत मिळाले आहेत. यावरून भाजपा आपला मित्र पक्ष काहीही कामाचा नाही अशी प्रतिमा शिवसेनेची बनवत आहे
जानेवारी फेब्रुवारी २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका जाहीर होण्या आधीच महानगरपालिकेतील सत्ताधारी एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. यामधून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी निवडणूका एकत्र न लढण्याचे निश्चित केले आहे. शिवसेनेने सुद्धा राज्य सरकार मध्ये सहयोगी पक्ष असताना राज्य आणि केंद्र सरकारवर टिका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. शिवसेना आणि भाजपामध्ये जे कुरघोडी करण्याचे प्रकार सुरु आहेत त्यावरून नागरिकांचा मात्र चांगलाच टाईमपास होत आहे. सध्या दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या आरोप प्रत्यारोपाची मजा मुंबईकर नागरिक घेत आहेत. एकत्र मांडीला मांडीला सत्तेची मजा घ्यायची आणि बाहेर मात्र एकमेकांच्या विरोधात कारस्थान करायची हे न समजण्या इतपत मुंबईकर जनता मूर्ख नाही. मुंबईकर नागरिक शिवसेना आणि भाजपाला येत्या निवडणूकीत याचा जबाब देईल यात शंका नाही.
अजेयकुमार जाधव
मोबाईल - ९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment