नालेसफाईच्या मुद्द्यावर झोपलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्याची वेळ आली आहे - सचिन अहिर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाईच्या मुद्द्यावर झोपलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्याची वेळ आली आहे - सचिन अहिर

Share This
मुंबई उपनगरातील नालेसफाईच्या कामांच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन
मुंबई : १८ मे / प्रतिनिधी
वारंवार इशारे देवूनही नालेसफाईच्या कामांकडे महापालिकेचे होत असलेले साफ दुर्लक्ष मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारे असून झोपलेल्या सत्ताधाऱ्यांना खडबडून जागे करण्याची वेळ आलेली आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई विभागिय अध्यक्ष सचिन अहिर यांनी गुरूवार दिनांक १९ मे रोजी मुंबईतल्या प्रमुख नाल्यांची पाहणी करण्याचे नियोजन केले आहे. या पाहणीदरम्यान नालेसफाईचीकामे सुरूच झालेली नसल्याचे किंवा असमाधानकारक झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याच नाल्यांमधील गाळ सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांच्या कार्यालयांसमोर टाकणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


गेल्या वर्षी पहिल्या पावसातच अवघी मुंबई जलमय झाली होती. यंदाही नालेसफाई अभावी त्याच घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याची भीती मा. अहिर यांनी व्यक्त केली आहे. परिणामी युद्धपातळीवर हे नालेसफाईचे काम महापालिकेने हाती घ्यावे, असे आवाहन आपण आठवड्याभरापुर्वी सत्ताधाऱ्यांना केले होते. तसेच त्यावेळी आपण नालेसफाईची पाहणी करण्याची घोषणाही केल्याचे अहिर म्हणाले. त्यानुसार गुरूवारी संपुर्ण दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते, स्थानिक नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत आपण मुंबई उपनगरातील प्रमुख नाल्यांची पाहणी करणार असल्याचे ते म्हणाले.

नालेसफाईच्या कंत्राटांमध्ये पारदर्शकता हवी - सचिन अहिर
नालेसफाईमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याची बाबही काही महिन्यांपुर्वीच चौकशीद्वारे उघड झाली असल्याचे सांगत अहिर म्हणाले की, नालेसफाईच्या कंत्राटांच्या आडून होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने होण्याची गरज असून ती प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पुर्ण करून नालेसफाईच्या कामांना वेग देण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages