खरीपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खरीपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा

Share This
महाबीज बियाण्यांच्या दरवाढीला मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ स्थगिती
मुंबई, दि. 14 :
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने बियाणे आणि खतांच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला असताना राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) केलेल्या बियाण्यांच्या दरवाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तात्काळ स्थगिती दिली. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या दरवाढीबाबत सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला.

दुष्काळ आणि नापिकीच्या पार्श्वभूमीवर महाबीजने बियाण्यांच्या दरात वाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर असताना ही दरवाढ शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणणारी असल्याची तक्रारही होती. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदस्यांनी याबाबतच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवताना आपली नाराजीही व्यक्त केली होती. याबाबत गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीने बियाण्यांच्या दरवाढीस स्थगिती देण्याचा आदेश महामंडळास दिला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना पूर्वीच्याच दराने बियाणे उपलब्ध होणार आहे.

राज्यातील 29 हजार गावांत दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र, यंदा समाधानकारक पाऊसमान अपेक्षित असल्याने शेतकऱ्यांनी उत्साहात पेरणीची तयारी केली आहे. अशातच खासगी बियाण्यांबरोबर राज्य बियाणे महामंडळाने आपल्या बियाण्यांच्या दरात वाढ केली होती. शेतकऱ्यांमध्ये याबाबत नाराजी होती. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी तातडीने लक्ष घालून ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी होत होती.

राज्यातील कृषी विकासाबरोबरच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. कृषी उत्पन्नात वाढ करण्यासह सिंचन सुविधांच्या निर्मितीसाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे यासारख्या योजना हाती घेण्याात आल्या आहेत. पीक कर्ज वितरणात वाढ, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अर्थसंकल्पातही कृषी क्षेत्राच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages