मुंबई, दि. 24 : भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) महासंचालक तथा केंद्र शासनाच्या आरोग्य शिक्षण सचिव सौम्या स्वामीनाथन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संस्थेमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. विदर्भात सिकलसेलसारख्या अनुवांशिक रोगांच्या रुग्णांवर उपचार व्हावेत, यासाठी संस्थेने नागपूरमध्ये संशोधन केंद्र सुरू करावे.तसेच खासगी रुग्णालयामार्फतही टीबीच्या रुग्णांवर उपचार व्हावेत,यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. यासाठी दोन्हीसाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, राज्यमंत्री राम शिंदे, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, प्रधान सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव मिलिंद म्हैसकर, राष्ट्रीय विषाणू संस्थेचे संचालक डॉ. देवेंद्र मौर्य, डॉ. लक्ष्मीनारायण, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इमिनोहेमटॉलॉजीच्या प्रमुख डॉ. मनिषा मडकैकर, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या संचालक डॉ. स्मिता महाले, डॉ. जगदीश देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी हाफकिन इन्स्टिट्यूट आणखी सक्षम करणे, तसेच त्या ठिकाणी पोलिओवर प्रगत संशोधन सुरू करणे, एन्ट्रो व्हायरस इन्स्टिट्यूटला जागा देणे, जेनेरिक रिसर्च सेंटरचे सक्षमीकरण, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेस जागा उपलब्ध करून देणे आणि टीबी नियंत्रणासाठी राज्य शासन व आयसीएमआर यांच्यात सहकार्य करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.
No comments:
Post a Comment