मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई क्षेत्राची व्याप्ती लक्षात घेता, मुंबई शहरासह उपनगरात आरोग्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका विविध लोकोपयोगी उपक्रम राबवित असून महापालिका प्रशासनाने पालिकेची सर्व रुग्णालये सुसज्ज व आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करावीत, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली येथील हरिलाल भगवती महापालिका सर्वसाधारण रुग्णालय अंतर्गत ‘परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत व ११० खाटांचे पर्यायी रुग्णालय’चे लोकार्पण मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महापौर बोलत होते.
महापौर स्नेहल आंबेकर पुढे म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी नागरिकांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. हरिलाल भगवती महापालिका सर्वसाधारण रुग्णालय अंतर्गत ‘परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत व ११० खाटांचे पर्यायी रुग्णालय’ हे याचाच एक भाग आहे. परिचारिका प्रशिक्षण केंद्र हे प्रशासनाने मॉडेल म्हणून प्रस्तुत करावे. महापालिकेची सर्व रुग्णालये आधुनिक तंत्रज्ञानाने नागरिकांसाठी सुसज्ज ठेवावे. एखादी दुर्घटना घडली तर जवळच्या महापालिका रुग्णालयात सर्व यंत्रणा असली पाहिजेत. त्यादृष्टीने पालिकेचे रुग्णालयही सज्ज ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महापालिका प्रशासनाला नागरिकांच्या हितासाठी जे-जे करणे शक्य आहे ते करताना लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वच सहकार्य करीत असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.
खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले की, ५० वर्षांपूर्वी हरिलाल भगवती यांनी महापालिका रुग्णालयाकरीता ही जागा दान दिली आहे. ५० वर्षांपूर्वी आपल्या जमिनी नागरी हितासाठी दान देत होते, आता तसे आढळत नाही. नागरी हिताची कामे करताना लोकांचा सहभाग गरजेचा आहे. तो सहभाग मिळवून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे आवाहन शेट्टी यांनी केले. स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी सांगितले की, पुनर्बांधणी होत असलेल्या हरिलाल भगवती महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. या संदर्भात आपण विधिमंडळातही आवाज उठविल्याचे चौधरी यांनी नमूद केले. आमदार प्रकाश सुर्वे व सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम यांचीही समयोचित भाषणे झाली.
No comments:
Post a Comment