नवी दिल्ली - विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जातप्रमाणपत्र आणि अधिवास दाखल आधार कार्डशी जोडण्याबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांना विचारणा केली आहे. त्यामुळे आधार कार्ड हा जातप्रमाणपत्र आणि अधिवास दाखल यांना जोडणारा दुवा ठरणार आहे.
विद्यार्थी पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत असतानाच त्यांना ६० दिवसांच्या आत जातप्रमाणपत्र आणि अधिवास दाखला उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. शिष्यवृत्ती मिळण्यात विलंब होत असल्याने अनुसूचित जाती (एससी) आणि जमाती (एसटी)च्या विद्यार्थ्यांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. सरकारी अधिकाऱ्यांच्या अंदाधुंद कारभारामुळे ही कागदपत्रे मिळविण्यात विलंब होत असल्याची नागरिकांची तक्रार होती.
प्रत्येक राज्यातील सरकारने जातप्रमाणपत्र आणि अधिवास दाखला यांची प्रक्रिया ऑनलाइन करावी. त्याचप्रमाणे प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याची वारंवार माहिती देण्यात यावी. तसेच, शक्य असल्यास ही प्रमाणपत्रे आधार कार्डशी जोडण्यात यावीत, असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून देशातील प्रत्येक नागरिकास आधार कार्डचे वितरण करण्यात येत आहे. आधार कार्डचा १२ अंकांचा क्रमांक नागरिकांसाठी विशिष्ट ओळख ठरत आहे.
No comments:
Post a Comment