डास प्रतिबंधासाठी महापालिकेने हटविले ३ हजार १७८ टायर्स - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 June 2016

डास प्रतिबंधासाठी महापालिकेने हटविले ३ हजार १७८ टायर्स

१ लाख ८८ हजार ६१६ इतर वस्तू देखील हटविल्या
डेंग्यू मलेरिया प्रतिबंधासाठी सजग राहण्याचे महापालिकेचे नागरिकांना आवाहन
मुंबई / प्रतिनिधी - 
डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी देखील महापालिकेद्वारे सर्वस्तरीय प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या यासारख्या वस्तूंमध्ये साचलेल्या अगदी थोड्या पाण्यात देखील डासांची उत्पत्ती होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन १ जानेवारी ते ३१ मे २०१६ या ५ महिन्यांच्या कालावधीत ३ हजार १७८ टायर्स आणि थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या १ लाख ८८ हजार ६१६ इतर वस्तू हटविण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी देखील डास प्रतिबंधाबाबत आवश्यक ती सर्व काळजी घेऊन महापालिकेच्या कीटकनाशक विभागास सहाय्य करावे, असे आवाहन महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी केले आहे.


डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणा-या `एडीस इजिप्टाय' डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. तर मलेरियाच्या बाबतीत मलेरियाचे परजीवी (Plasmodium Species) पसरविणा-या `ऍनॉफिलीस स्टीफेन्सी' डासाची उत्पत्ती देखील स्वच्छ पाण्यातच होते. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान घरात व घराशेजारील परिसरात पाणी साचलेल्या ठिकाणी डेंग्यू व मलेरियाचा प्रसार करणा-या डासांची उत्पत्ती स्थाने आढळून येत आहेत.

टायर्स, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या विविध वस्तुंमध्ये पावसाचे वा इतर पाणी साचते. यामध्ये अगदी थोड्याप्रमाणात साचलेल्या वा असणा-या पाण्यात देखील डास अंडी घालतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे संपूर्ण बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात नियमित स्वरुपात तपासणी करुन टायर्स व पाणी साचतील अशा इतर वस्तू शोधून हटविण्यात येत आहेत. यानुसार गेल्या ५ महिन्यात करण्यात आलेल्या कार्यवाही दरम्यान महापालिकेच्या `जी दक्षिण' व `एम पश्चिम' विभागात सर्वाधिक म्हणजे ३१६ टायर्स हटविण्यात आले आहेत. तर त्या खालोखाल `एम पूर्व' विभागातून २५७ व आर उत्तर विभागातून २४५ टायर्स हटविण्यात आले आहेत. तर सर्व २४ विभागातून ३ हजार १७८ टायर्स हटविण्यात आले आहेत.

पावसाचे वा इतर पाणी साचू शकेल अशा इतर वस्तू देखील महापालिकेद्वारे हटविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या विविध वस्तुंचा समावेश आहे. याअंतर्गत सर्वाधिक म्हणजे ३० हजार ४२३ वस्तू महापालिकेच्या `जी उत्तर' विभागातून हटविण्यात आल्या आहेत. तर त्या खालोखाल २८ हजार १९८ वस्तू या `इ' विभागातून हटविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सर्व २४ विभागातून १ लाख ८८ ६१६ इतर वस्तू हटविण्यात आल्या आहेत.

टायर्स सह पावसाचे वा इतर पाणी साचू शकेल अशा इतर वस्तुंमध्ये साचणा-या अगदी थोड्या पाण्यात देखील डास अंडी घालतात, ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू शक्य तितक्या लवकर नष्ट करुन महपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad