इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेच्या लाभाच्या रकमेत वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेच्या लाभाच्या रकमेत वाढ

Share This
मुंबई, दि. 18 : राज्यातील इमारत व  इतर विविध बांधकाम क्षेत्रातील मंडळामध्ये नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य, सुरक्षा, शिक्षण, विमा इत्यादी विविध 15 योजनांतील लाभाच्या रकमेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती कामगार आयुक्त  वाय. ई. केरूरे यांनी दिली.

याविषयीचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला आहे. त्यात नमूद योजना व रकमेतील वाढ पुढीलप्रमाणे : स्त्री बांधकाम कामगारास तसेच पुरूष कामगाराच्या पत्नीस दोन अपत्यांपर्यंत  प्रसूती अर्थसहाय्य  15,000 रू.ते 20,000रु.(फक्त एकदा),कामगाराच्या दोन पाल्यास प्रति शैक्षणिक वर्षी शाळेतील 75 टक्के उपस्थिती असल्यास 1 ली ते 7 वी 2,500 रू., 8 वी ते 10 वी. 5,000रू. एवढे अर्थसहाय्य,कामगाराच्या पाल्यास 11 वी ते 12 वीच्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी 10,000 रू. शैक्षणिक सहाय्य तर 10 वी 12 वीमध्ये 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 रू. प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य, बांधकाम कामगाराच्या पाल्यास अथवा त्याच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, व्दितीय, तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक साहित्यासाठी प्रतिवर्षी 20,000रू., तसेच शासनमान्य महाविद्यालय किंवा संस्थेतील वैद्यकीय शिक्षणाकरीता 1,00,000रू., इंजिनियरिंग करीता 60,000रू. इतके अर्थसहाय्य प्रति शैक्षणिक वर्षासाठी देण्यात येणार आहे, असे केरुरे यांनी सांगितले. 
            
पदविका शिक्षण घेत असल्यास 20,000 रु.,पदव्‍युत्तर पदविका शिक्षण घेत असल्यास 25,000 रू.प्रती शैक्षणिक वर्षासाठी अर्थसहाय्य, लाभार्थी कामगाराच्या पती अथवा पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास एका मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत  1,00,000 रू. मुदत बंद ठेव असेल. लाभार्थी कामगारास 75 टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यास 2,00,000 रू. अर्थसहाय्य तथापि संबंधित कामागाराचे विमा संरक्षण असल्यास विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा 2,00,000 रू. सहाय्य यापैकी कोणत्याही एकच लाभ घेता येईल. लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या वारसास अंत्यविधीसाठी 10,000 रूपयांची मदत तसेच संबंधित कामगारा विधवा पत्नी अथवा विधुर पतीस 24,000 रू.एवढे आर्थिक सहाय्य प्रतिवर्षी 5 वर्षांपर्यंत देण्यात येणार आहे, असेही केरुरे यांनी सांगितले.

नोंदित लाभार्थी कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास 5,00,000 रू.इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. लाभार्थी कामगाराच्या कुटुंबातील सदस्यास गंभीर आजाराच्या उपचारार्थ 1,00,000रू. हे फक्त एका सदस्यास एकदाच मिळणार (हा लाभ दोन सदस्यापर्यंत मर्यादित) तथापि आरोग्य विमा योजना लागू नसल्यासच सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थी कामगाराच्या दोन पाल्यांच्या संगणकाचे (एमएस-सीआयटी) चे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. त्याच बरोबर, बांधकाम कामगारांच्या स्वत: च्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीकरीता 30,000रू. (फक्त एकदा) एवढे अनुदान देण्यात येणार आहे.
            
राज्यातील बांधकाम क्षेत्रातील सर्व बांधकाम कामगारांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यातील कामगार आयुक्त यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांशी संपर्क करून मंडळामध्ये आपले नाव नोंदणीकृत करून घ्यावे. असे  आवाहनही  कामगार आयुक्तांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages