आगीचा धोका असलेल्या मुंबईतील 6512 इमारतींचे फायर ऑडिटचे काम प्रगतिपथावर - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आगीचा धोका असलेल्या मुंबईतील 6512 इमारतींचे फायर ऑडिटचे काम प्रगतिपथावर - मुख्यमंत्री

Share This
मुंबई, दि. 28 : आगीचा धोका असणाऱ्या मुंबईतील 6512 इमारतींचे फायर ऑडिट करण्याचे काम प्रगतिपथावर असून आगीचा धोका जास्त असलेल्या ठिकाणांचे एरिया मॅपिंगचे काम सुरु करण्यात येणार आहे. मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. 


विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, मुंबईमध्ये 2015-16 या वर्षात आगीच्या एकूण 5212 दुर्घटना घडल्या असून त्यातील 3417 या सदोष विद्युत प्रणालीमुळे घडलेल्या आहेत.
विद्युत पुरवठ्यासाठी चांगल्या दर्जाची साधनसामुग्री वापरणे, जुन्या विद्युत वाहिन्या बदलणे, त्यांचे नियमित परिक्षण करणे याची जबाबदारी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची आहे. त्यांनी नियमितपणे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना कायदा 2006 अन्वये इमारतींमधील आग प्रतिबंधक व जीव संरक्षक प्रणालीची तपासणी करुन त्याचा अहवाल दर सहा महिन्यांनी अग्नीशमन दलास सादर करण्याची जबाबदारी आहे.
अशा प्रकारच्या आगीच्या घटनांमध्ये बऱ्याचदा मुंबई महापालिका अधिनियम 1888 च्या कलम 394चा भंग केल्याचे निदर्शनास आले आहे. या नियमभंगासाठी दंडाची रक्कम कमी असून त्यात सुधारणा करुन दंडाची रक्कम वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. जेणेकरुन या नियमाचे उल्लंघन होणार नाही.
मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी वर्षातून दोन वेळा इमारतींचे सर्टिफिकेशन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात सर्वसमावेशक अशी नियमावली करण्यात येईल. या इमारतींचे सर्टिफिकेशन होते की नाही याचे संनियंत्रण मुंबई महापालिकेने करावे यासाठी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात यावी. एखाद्या परवानाधारक संस्थेने इमारतीचे सर्टिफिकेशन दिले आणि त्यानंतर आगीची दुर्घटना झाली अशा वेळी कारवाई संदर्भात नियमावली करण्यात येईल.
मुंबईत ज्या भागात चिंचोळ्या गल्ल्या आहेत जेथे अग्नीशमन दलाचे वाहन जाऊ शकत नाही अशी ठिकाणे निश्चित करुन त्यांचे फायर ऑडिट करण्यात येईल आणि सर्वेक्षनाचा कालबध्द कार्यक्रम करण्यात येईल. मुंबई अग्नीशमन दलाकडे 56 फायर इंजिन, 28 मोठ्या क्षमतेचे पाण्याचे टँकर, तीन फोम टेंडर, टर्न टेबल लॅडर आदी यंत्रसामुग्री व वाहने असून ती 34 अग्नीशमन केंद्रावर कार्यरत आहेत. याशिवाय 17 क्विक रिस्पान्स मल्टिपर्पज वाहने, तीन मिनी फायर टेंडर, 81 मीटर उंचीचे हायड्रोलिक फ्लॅटफार्म असे साहित्य मुंबई अग्नीशमन दलास प्राप्त होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य पराग अळवणी, विजय वडेट्टिवार, अमित साटम, वर्षा गायकवाड, बच्चु कडू, आशिष शेलार यांनी भाग घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages