मुंबई, दि. 21 : राज्यातील गरीब जनतेला देखील न्यू क्लिक ॲसिड टेस्ट (नॅट)द्वारे शुध्द रक्त मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून या चाचणीसाठी कुठली पध्दत वापरायची यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती स्थापन करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य ॲड. राहुल कुल यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, राज्यात स्वैच्छिक रक्तदानाची टक्केवारी 96.82 एवढी आहे. रक्तदानाच्या माध्यमातून 15 लाख 66 हजार बाटल्या रक्त संकलन केले जाते. रक्ताच्या संक्रमणातून एड्सची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ऑक्टोबर 2014 ते मार्च 2016 या कालावधीत 182 असल्याचे निदर्शनास आले आहे. रक्तातून होणारे एड्सचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. रक्तदात्याच्या रक्तामध्ये एचआयव्ही तसेच हेपेटायटिस बी व सी आणि मलेरियाची बाधा आढळल्यास ती रक्ताची पिशवी तांत्रिक पध्दतीने निष्कासित करण्यात येते. तसेच या रक्तदात्याला भविष्यात रक्तदान न करण्याबाबत समुपदेशन करण्यात येते.
एचआयव्हीचा विषाणू मानवी शरीरात गेल्यानंतर काही काळ सुप्त अवस्थेत राहतो. प्रथम संसर्ग व मानवी शरीरात प्रतिद्रव्यामधील एचआयव्ही विषाणूच्या तपासणीदरम्यान जोपर्यंत संसर्गाचे निदान होत नाही, तोपर्यंतच्या स्थितीला गवाक्षकाळ (विंडो पिरेड) असे म्हणतात. रक्तदाता रक्तदान करताना जर गवाक्षकाळमध्ये असेल तर त्याने दिलेल्या रक्ताचे ELISA चाचणीत निदान होत नाही. हा गवाक्षकाळ व्यक्तीच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून असून तो जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत असतो.
फोर्थ जनरेशन एलायझा चाचणीमुळे तीन आठवड्याच्या चाचणीत एचआयव्ही संसर्गाचे निदान करता येते. मात्र गवाक्षकाळमधील रक्तातील विषाणू शोधण्यासाठी नॅट टेस्ट प्रभावी ठरते. या चाचणीमध्ये एका आठवड्यात एचआयव्ही संसर्गाचे निदान करता येते.
राज्यात चांगल्या प्रतिचे रक्त उपलब्ध व्हावे यासाठी नॅट चाचणी योग्य असून जिल्हानिहाय नॅट प्रमाणित रक्त मिळण्यासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न केले जात आहे. सध्या राज्यामध्ये 14 ठिकाणी अशाप्रकारे नॅट प्रमाणित रक्त मिळते. मात्र गरीब रुग्णांना अशा प्रकारचे रक्त मिळण्यासाठी राज्य शासनाची कार्यवाही सुरु आहे. नॅट चाचणीसाठी मिनीपूल की इंडिव्हिजुअल यापैकी कुठली पध्दत अवलंबावी, यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार असून येत्या सहा महिन्यांत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विजय वडेट्टिवार, राम कदम आदींनी भाग घेतला.
No comments:
Post a Comment