मुंबईकरांना पायाभूत सुविधा पुरवण्यात महापालिकेतील सत्ताधारी अपयशी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईकरांना पायाभूत सुविधा पुरवण्यात महापालिकेतील सत्ताधारी अपयशी

Share This
रस्त्यामधील खड्ड्यामध्ये केले आमदार नितेश राणे यांनी वृक्षारोपण
मुंबई / प्रतिनिधी 1 जुलै 2016
मुंबई महापालिकेची सत्ता  गेली पंधरा वर्षे उपभोगणारे शिवसेना व भाजप हे पक्ष मुंबईकरांना पायाभूत सुविधा पुरवण्यात सपशेल अयशस्वी ठरले आहेत. पाऊस सुरु झाल्यावर मुंबईतील  सर्व रस्त्यांवर दरवर्षी खड्ड्यांचे साम्राज्य पसरते.  यंदा ही मुंबईतील रस्ते खड्ड्यांमध्ये हरवले आहेत, मात्र सत्ताधार्यांचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. या समस्येकडे  त्यांचे लक्ष वेधण्यासाठी व शिवसेना भाजपचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी रस्त्यांमधील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे आमदार व स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख नितेश राणे यांनी केले. 


सांताक्रुझ पश्चिम येथील चुनाभट्टी सर्कल येथील रस्त्यामधील खड्ड्यामध्ये त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रस्त्यांवरील खड्ड्यांकडे मुंबई महापालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने या समस्येकडे सत्ताधार्यांचे लक्ष वेधण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी आज सांताक्रुझ येथील  रस्त्यामधील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन अभिनव पध्दतीचे आंदोलन केले.

राज्य सरकारतर्फे दोन कोटी झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. याच वेळी आमदार राणे यांनी हे आंदोलन करुन महापालिकेतील सत्ताधार्यांच्या अकार्यक्षमतेचा बुरखा फाडला. महापालिकेतील सत्ताधार्यांना खड्डे दिसत नसल्याने त्यांना या समस्येची जाणिव व्हावी या हेतूने हे वृक्षारोपण करण्यात आले. 
यावेळी राणे यांनी शिवसेना व भाजपच्या नेत्यांवर टीका केली. सेना भाजप आपापसात भांडायचे नाटक करत असून महापालिकेतील सत्तेचा मलिदा जास्त मिळावा यासाठी त्यांचे हे नाटक सुरु आहे. मुंबईकरांनी त्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे राणे म्हणाले.

शिवसेना व भाजपचे नेते स्थायी समितीमध्ये परस्पर सामंजस्याने टक्केवारीचा मलिदा वाटून घेतात  त्यामुळे त्यांना एकमेकांविरोधात टीका करण्याचा अधिकार नाही असे ते म्हणाले..स्थायी समितीतील टक्केवारी बंद करा मग बोला असे त्यांनी सुनावले. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही मुंबई करांना सुविधा मिळत नसल्याने हा निधी कुणाच्या उदरनिर्वाहासाठी वापरला जातो हे स्पष्ट होते. 

महापालिकेच्या सत्तेचा लाभ  वाद्र्याचे शिवसेनेचे साहेब, त्यांचे पीए, मेहुणे व भाजपचे वांद्रे येथील अध्यक्ष यांना होत असून  सर्वसामान्य नागरिकांना मात्र केवळ त्रास सहन करावा लागत आहे असे ते म्हणाले. कल्याण डोंबिवली येथील महापालिका निवडणूकीप्रमाणे मुंबईत भांडणाचा देखावा करुन नागरिकांना मुर्ख बनवण्याचा हा प्रयत्न आहे मात्र मुंबईकर त्यांच्या या दिखाव्याला भुलणार नाहीत असे नितेश राणे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages