'सायकल टू वर्क'ला प्रोत्साहन देण्यासाठी ४७० सायकलींसाठी मोफत पार्किंग
५ हजार ६५० चार चाकी वाहनांसह ८ हजार १९७ वाहनांचे 'पार्किंग' शक्य
मुंबई / प्रतिनिधी
दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या 'ए' विभागांतर्गत येणा-या ४७ वाहनतळांची निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे. या ४७ वाहनतळांवर ५,६५० चार चाकी वाहनांचे तर २,५४७ दुचाकी वाहनांचे पार्किंग शक्य होणार आहे. यानुसार एकूण ८,१९७ वाहनांचे पार्किंग या ठिकाणी शक्य होणार आहे. विशेष म्हणजे 'सायकल टू वर्क'ला प्रोत्साहन देण्यासाठी या निविदा प्रक्रियेंतर्गत प्रत्येक वाहनतळावर १०, याप्रमाणे ४७ ठिकाणी ४७० सायकलींसाठी मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या प्रकारे सायकलींसाठी मोफत पार्किंग सुविधा महापालिका क्षेत्रात प्रथमच उपलब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहिती 'ए' विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.
महापालिकेच्या 'ए' विभागातील ४७ वाहनतळ जागांबाबत सहा महिन्यांच्या तात्पुरत्या कालावधीसाठी किंवा न्यायालयीन विलंबित प्रकरण जे अलीकडील आहे, या मुदतीकरता 'जेथे आहे जसे आहे तेथे आहे' या तत्त्वावर रस्त्यावरील 'पे ऍण्ड पार्क'चे प्रवर्तन व देखभाल करण्याबाबत महापालिकेच्या निर्धारित पध्दतीनुसार इच्छुकांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदा प्रक्रियेनंतर महापालिकेच्या महसुलात किमान १ कोटी १४ लाख ३१ हजार रुपये एवढी भर पडणे अपेक्षित आहे. या निविदेमध्ये सहभागी होण्यासाठी संबंधितांना महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in (www.mcgm.gov.in) या संकेतस्थळावर २१ जुलै २०१६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच निविदा प्रक्रियेमध्ये यशस्वी ठरणा-या संबंधित कंत्राटदारांना सुरक्षा ठेवेसह ६ महिन्यांची `बँक गॅरंटी' देणे आवश्यक असणार आहे.
No comments:
Post a Comment