जागतिक दर्जाचे आणि देशाची राजधानी असलेल्या मुंबई शहरात गेले काही वर्षे पाण्याची समस्या भेडसावत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची पातळी कमी असल्याने सातत्याने पाणी कपात करावी लागत आहे. यामुळे मुंबई सारख्या जागतिक दर्जाच्या शहरात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होत असते.
मुंबई मध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्याने सं २००७ मध्ये पालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना राबवली. ही संकल्पना राबवताना मुंबई मध्ये ज्या ठिकाणी ५०० चौरस मीटर पेक्षा जास्त भूखंडावर इमारती बांधायच्या आहेत त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे असा नियम करण्यात आला. हा नियम करून ९ वर्षे झाली तरी अद्याप ही संकल्पना राबवण्यात पालिकेला अपयश आले आहे.
सन २०१३ - १४ मध्ये तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांनी स्वतः पालिकेचे कान उपटत मुंबई सारख्या शहरात ५० ते ५५ हजार इमारती उभ्या राहिल्या असताना त्या पैकी कित्तेक इमारती मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केले नसल्याचे समोर आल्याचे मान्य केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग होत नसल्याने नेमक्या किती इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केले याची आकडेवारी नागरिकांसमोर आणण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.
पालिका प्रशासन इतके सुस्त आहे की त्यांनी अद्याप ही श्वेतपत्रिका मुंबईकर नागरिकांसमोर आणलेली नाही. पाणी वाचवण्याचे नुसते जाहिराती मधून संदेश देणारी पालिका पाणी वाचवण्याकडे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग न करणाऱ्या बिल्डर लॉबीकडे मात्र दुर्लक्ष करत आहे. प्रशासन दुर्लक्ष करत असले तरी त्यावर अंकुश असणारे सत्ताधारी आणि दबाव गट म्हणून काम करणारे विरोधकही या प्रश्नाकडे म्हणावे तसे लक्ष देताना दिसत नाही.
पालिका प्रशासन, सत्ताधारी, विरोधी पक्ष पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असताना यावर्षी निसर्ग मात्र मुंबईकर नागरिकांसाठी धावून आला आहे. मुंबईमध्ये दरवर्षी पावसाची सुरवात उशिरा होत असते. त्यामुळे तलावांमध्ये पाण्याचा साठा जमा होण्यास उशीर होत असतो. तलावामध्ये दरवर्षी पाण्याचा साठा समाधानकारक जमा झाल्याचे दिसल्यास पाणी कपात रद्द केली जाते. यावर्षी मुबईमध्ये पावसाची सुरुवात २१ जून पासून सुरू झाल्यावर एका महिन्याच्या आत मुंबईला लागणार अर्धा पाणीसाठा जमा झाला आहे.
मुंबईमध्ये २१ जूनला पाऊस पडण्यास सुरुवात झाली येवले मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये ९७ हजार १०८ दशलक्ष लिटर इतके पाणी शिल्लक होते. ९ जुलैला हा पाणीसाठा २ लाख ९९ हजार १४१ दशलक्ष लिटर इतका झाला होता. ११ जुलै पासून पावसाने जोर पकडल्याने १७ जुलै पर्यंत पाण्याच्या पातळीत वाढ होत ७ लाख १० हजार दशलक्ष लिटर इतका पाणी साठा जमा झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी (१७ जुलै २०१५) पाण्याचा साठा २ लाख ७५ हजार ३३४ दशलक्ष लिटर इतका होता. मुंबईला वर्षाला १४ लाख दशलक्ष लिटर इतके पाणी लागत असल्याने सध्या अर्धा पाणी साठा जमा झाला आहे.
दरवर्षी उशिरा पाण्याचा साठा जमा होत असल्याने उशिरा पाणी कपात रद्द करण्याची सवय पालिका प्रशासनाला पडलेली आहे. यावर्षी पाऊस सुरू होऊन एक महिनाही पूर्ण झाला नसताना अर्धी तलाव भरली आहेत. याचा विचार प्रशासनाने करावा. पावसाचा मौसम आणखी दोन महिने आहे. यावेळात ही तलाव तुडुंब भरून वाहतील यात काही शंका नाही. यामुळे पालिका प्रशासनाने मुंबईमध्ये ऑगस्ट २०१५ पासून लागू केलेली २० टक्के पाणी कपात त्वरित रद्द करण्यास काहीही हरकत नाही.
वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांमधून धरणात समाधानकारक पाणी साठा असल्याने पाणी कपात रद्द करण्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होताच मागील स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाच्या दिलीप पटेल यांनी पाणी कपात मागे घेण्याची मागणी केली. या मागणीला सत्ताधारी शिवसेनेने पाठिंबा देत त्वरित पाणी कपात रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला देणे गरजेचे होते. परंतू प्रशासनाला पुढील बैठकीत याबाबत अहवाल सादर करण्याचे सांगत शिवसेनेने वेळ मारून नेण्याचे काम केले.
आपल्या पक्षावर कुरघोडी करणारा मित्र पक्ष भाजपाने मागणी केल्याने पाणी कपात रद्द केली नसली तरी आता शिवसेनेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र देऊन पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली आहे. याचा विचार पालिका प्रशासनाने नक्की करायला हवा. स्थायी समितीने मुंबईकर नागरिकांची पाणी कपाती पासून सुटका करण्यासाठी पुढाकार घ्यायलाच हवा.
तलावांमधील पाणी साठा १७ जुलै २०१६ सकाळी ६ वाजता
तलाव दशलक्ष लिटर
मोडक सागर ७०५३०
तानसा ८३५२२
विहार १३६७३
तुलसी ७७६३
अप्पर वैतरणा ७७४८४
भातसा ३६०९३५
मध्य वैतरणा ९६१४८
मोडक सागर ७०५३०
तानसा ८३५२२
विहार १३६७३
तुलसी ७७६३
अप्पर वैतरणा ७७४८४
भातसा ३६०९३५
मध्य वैतरणा ९६१४८
एकूण ७,१०,०५५ दशलक्ष लिटर
(मागील वर्षी याच दिवशी पाण्याचा साठा २ लाख ७५ हजार ३३४ दशलक्ष लिटर इतका होता)
अजेयकुमार जाधव ( मो. ९९६९१९१३६३ )
No comments:
Post a Comment