मुंबई / प्रतिनिधी - पावसाळ्यादरम्यान पावसाचे पाणी साचून डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांना कारणीभूत ठरणा-या डासांची उत्पत्तीस्थाने तयार होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलीस कल्याण विभागाद्वारे कीटकनियंत्रण विषयक जनजागृतीपर चर्चासत्र आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सहपोलीस आयुक्त (प्रशासन) अनुपकुमार सिंह यांचे बृहन्मुंबई महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी विशेष आभार मानले आहेत. यानुसार महापालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याच्या सहकार्याने आतापर्यंत मुंबईतील ४० पोलीस ठाण्यांमध्ये जनजागृतीपर चर्चासत्रे आयोजित केली आहेत. तर उर्वरित ५३ पोलीस ठाण्यांमध्ये येत्या शनिवार पर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे, अशीही माहिती नारिंग्रेकर यांनी दिली आहे. मुंबई पोलीस दलामध्ये साधारणपणे ५ हजार ५०० अधिका-यांसह ४० हजारांहून अधिक संख्येने असणा-या पोलीसांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment