माणसं मारून गाईंचे रक्षण व्हायला लागले तर मनुष्याचे रक्षण कोण करणार? - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

माणसं मारून गाईंचे रक्षण व्हायला लागले तर मनुष्याचे रक्षण कोण करणार? - रामदास आठवले

Share This
नवी दिल्ली, दि. ३० - गुजरातमधील उना येथील गो रक्षकांनी दलित तरूणांना केलेल्या मारहाणीवरून वातावरण तापलेले असतानाच सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं नेते रामदास आठवले यांनी या मुद्यावर भाष्य करताना ' गो रक्षण करताना मनुष्याचा बळी द्यायला नको' असे म्हटले आहे. ' माणसं मारून गाईंचे रक्षण व्हायला लागले तर मनुष्याचे रक्षण कोण करणार?' असा सवाल त्यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखती दरम्यान विचारला.
अहमदाबाद येथून ३६० किलोमीटरवरील आणि राजकोटजवळील उना येथे ११ जुलै रोजी चार दलित तरुणांना स्वत:ला गाईंचे संरक्षक म्हणविणाऱ्यांनी गायीच्या कथित हत्येबद्दल जबर मारहाण केली होती. मृत गायींची कातडी काढण्याचे काम त्या तरुणांकडे देण्यात आले होते. मात्र त्यांनी गाय मारली, असा आरोप करून, मारहाण केली गेली होती. त्याच मुद्यावरून संपूर्ण देशातील वातावरण तापलेले असून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तसचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेची निंदा करतानाच राज्यातील भाजप सरकार दलितविरोधी असल्यानेच कोणतीही कारवाई होत नाही' अशी टीका केली होती. 

या संपूर्ण मुद्यावर रामदास आठवले यांनी प्रथमच भाष्य केले. गोरक्षक चुकीचा मार्गाचे अवलंबन करत असल्याचे ते म्हणाले. गाईंची हत्या रोखण्यासाठी राज्यात कायदा तयार करण्यात आला आहे, त्या माध्यमातूनच त्यांचे रक्षण व्हायला हवे.   

त्यांचे तुम्ही गायींचे रक्षण करा पण त्यासाठी माणसाची हत्या का करता? माणसांचा जीव घेऊन तुम्ही गायींचे रक्षण करणार असाल तर मानवाचे रक्षण कोण करणार? असा सवाल त्यांनी विचारला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages