- सरकार नदीजोड प्रकल्प राबवणार
- मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या लक्षवेधीवर सरकारचे उत्तर
मुंबई दि. ३ (प्रतिनिधी) – कोयना धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती करणाऱ्या दोन संचा पैकी कोळकेवाडी येथील ३५० मेगावॉट क्षमतेचा संच बंद करून ते पाणी गुरुत्वाकर्षणाने मुंबईत आणता येऊ शकते. याबाबत सरकारने निर्देश दिले आहेत अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज विधानसभेत दिली. याबाबत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
राज्यात मुळशी येथून ५२३ एमसीएम, आंध्र ३३९ एमसीएम, वळवण ६६ एमसीएम, शिरवटे १९१ एमसीएम, लोणावळा १२ एमसीएम असे एकूण ११३१ एमसीएम तसेच कोयना जलविद्युत प्रकल्पतील १९६० मेगावॉट /२८३६ एमसीएम आणि तिल्लारीतील ८५ एमसीएम एवढा पाणी साठा उपलब्ध असतो. या जलविद्युत प्रकल्पांचे पाणी कमी प्रमाणात शेतीला वापरले जाते आणि मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. यातील बहुतांश पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे असे एकूण ४०५२ एमसीएम म्हणजेच महाराष्ट्रतील प्रमुख धरणातील एकूण पाण्याच्या १५ % पाणी वाया जाते. राज्यातील अनेक भागात असलेली तीव्र पाणी टंचाई पाहता हे पाणी पिण्यासाठी किंवा जलसिंचनासाठी वापरण्याच्या संदर्भात अभ्यास करणे आवश्यक आहे तर मुंबई पासून जवळ असलेल्या या प्रकल्पांतील वाया जाणारे पाणी मुंबई महानगरपालिका आणि टंचाईग्रस्त भागांशी जोडण्याबाबत शासन विचार करणार का ? अशी लक्षवेधी सूचना आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत उपस्थित केली होती. यातील मुळशी धरणातील पाणी सद्यस्थित वाया जात असले तरी ते शेतीसाठी आणि पिण्यासाठी मिळावे याबाबतच्या मागण्या आल्या असून त्याबाबत सरकार पुढील कार्यवाही करीत आहे असे राज्य मंत्र्यांनी सांगितले.
विशेषतः कोयना धरणातून जलविद्युत निर्मितीनंतर वशिष्ठ नदीत ६७.५० टी.एम.सी. पाणी सोडण्यात येते, हे पाणी ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील अन्य जिल्ह्यांत नेण्यासाठी पाणी उपसा करावा लागतो याबाबतचा अभ्यास राष्ट्रीय जलविकास अभिकरण तसेच क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यात आला आहे. राज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पामध्ये कोयनेचे ६७.५० टीएमसी पाणी मुंबईला वळविण्याचे प्रस्तावित आहे. राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने सादर केलेल्या अहवालानुसार या योजनेची सन २००९-१० वर्षाची अंदाजित किंमत २२३८.५१ कोटी होती. ही योजना आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे दिसून आल्याने सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याची विनंती राज्यसरकारने २६ ऑक्टोबर २०१५ च्या पत्राने राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाला केली आहे. तसेच कोयना अवजलाचा वापर मुंबईला होण्याबाबत सिडकोने नव्याने अभ्यास करावा अशा सूचनाही सरकारने केल्या आहेत. तर १९० मीटर वरून पाणी उचलण्यापेक्षा कोळ्केवाडी येथील संच बंद केल्यास १९० मीटर उंची वरून पाणी गुरुत्वाकर्षणाने मुंबईला आणता येईल असा पर्याय पुढे आला आहे. याबाबत निर्णय घेताना लोकप्रतिनिधीना विश्वासात घेऊन सरकार निर्णय घेईल अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
No comments:
Post a Comment