मंत्रालयासमोर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मंत्रालयासमोर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

Share This
मुंबई 24 Aug 2016 - वांद्रे येथील रहेजा स्कुल ऑफ आर्ट महाविद्यालयाचे प्रशासन विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क आकारात आहे. याबाबत शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने मंत्रालयासमोर ‘चिल्लर फेको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविद्यालया विरोधात कारवाई करण्याचे सोडून पोलिसांनीही दडपशाहीचा मार्ग स्विकारत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली. 

शैक्षणिक शुल्काच्या नावाखाली आकारलेली जादा रक्कम महाविद्यालयाने परत करावी, यासाठी विद्यार्थ्यांनी प्रशासनाला वारंवार विनंती केली होती. पण काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहुन विद्यार्थी भारती या संघटनेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली होती. पण त्यांनीही या प्रकरणी लक्ष घातले नाही. त्यामुळे हे सरकार पैशाला लालची असून ते रहेजाला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत मंगळवारी विद्यार्थ्यांनी मंत्रालयासमोर चिल्लर फेको आंदोलन केले. दुपारी 2 च्या सुमारास मंत्रालयासमोरील प्रशासन भवन इमारतीलगत मोजके विद्यार्थी जमले होते. त्यामुळे पोलीसांना आंदोलनाची तीव्रता ध्यानी आली नाही. पण अडीच वाजताच्या सुमारास जवळपास 100 विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्य सरकार आणि रहेजा प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मंत्रालयाच्या दिशेने चिल्लर फेकली.  

रस्ता ओलांडुन हे आंदोलक मंत्रालयाच्या पदपथावर आले असता , त्यांनी पुन्हा घोषणाबाजी केली. परंतु वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे सांगुन त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न पोलीसांनी केला. 20 ते 25 मिनिटे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झडप सुरू होती. विद्यार्थी एकत नसल्याचे पाहुन राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यात आले. पोलीसांचे संख्याबळ पाहुन पोलीस उपायुक्त शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. विद्यार्थ्यांना पोलीस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी अक्षरक्षः बुक्क्यांनी बदडले. एक उच्च पोलीस अधिकारीच मारहाण करत असल्याचे पाहुन बळ आलेल्या काही पोलीसांनी विद्यार्थीनींच्या केसाला पकडुन व्हॅनमध्ये कोंबले. त्यांच्यापाठोपाठ इतर पोलीसांनीही हात धुवुन घेतले. काही विद्यार्थानींच्या केसाला पकडुन पोलीस गाडीत कोंबत असल्याचे पाहुन भेदरलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. हे सर्व 18 ते 20 वयोगटातील होते. त्यामुळे संतापलेल्या पोलीसांनी बळाचा वापर करत त्यांनी व्हॅनमध्ये कोंबुन मरिनलाईन्स पोलीस ठाण्यात नेले. पोलीसांचा मार वाचवण्यासाठी ते गाडीत बसत असल्याचे पाहुन मंत्रालय प्रवेशव्दारावर असलेल्या अनेकांची मने हेलावली. 






No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages