मुंबई, दि. 19 : कृषी क्षेत्रातील नवनवीन उत्पादने व संशोधन बाजारात उपलब्ध व्हावीत,यासाठी विद्यापीठ आणि उद्योग यांनी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा. तसेच तरुणांनी उद्योजक बनावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केले.
स्मॉल अँड मिडियम बिझनेस चेंबर ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र औद्योगिक आणि आर्थिक विकास संघाच्या वतीने आयोजित लघु व मध्यम उद्योजक, उत्पादक आणि निर्यातदार परिषदेचे उद्घाटन विद्यासागर राव यांच्या हस्ते आज सांताक्रूझ येथील हॉटेल सहारा स्टार येथे झाले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर, एसएमई चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक व अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल महोदयांच्या हस्ते मुंबई बिझनेस फोरम आणि एसएमई कॉन्फडन्स इंडेक्सचे प्रकाशन करण्यात आले.
राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्राला नैसर्गिक देणगी मोठ्या प्रमाणावर लाभली आहे. या देणगीचा उपयोग राज्याच्या शाश्वत विकासासाठी करण्यात यावा. फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय व दुग्ध उत्पादन ही क्षेत्रे राज्याची बलस्थाने आहे. या क्षेत्रांबरोबरच कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना दिल्यास मोठ्या प्रमाणावर राज्याचा विकास होईल. तसेच राज्यातील विद्यापीठांमध्ये नाविन्यता आणि संशोधन, कौशल्य विकास आणि तरुणांनी उद्योजक व्हावे, यासाठी प्रोत्साहन देण्याच्या सूचना सर्व कुलगुरुंना देण्यात आल्या आहेत. कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करण्याची आवश्यकता असून जास्तीत जास्त तरूणांनी उद्योजक होऊन दुसऱ्यांना रोजगार देणारे व्हावे, यासाठी त्यांचे मतपरिवर्तन करणे गरजेचे आहे. विद्यापीठांमध्ये होणारे संशोधन व नवनवीन शोधाला बाजारात आणण्यासाठी उद्योजकांनीही पुढाकार घ्यावा.
महाराष्ट्र हे देशात उद्योगात अग्रेसर राज्य आहे. राज्याने उद्योगांच्या वाढीसाठी ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत अनेक सुधारणा केल्या आहेत. उद्योजकांच्या काही सूचना असतील तर त्यांनी त्या सूचना राज्य शासनाकडे द्याव्यात. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लघु व मध्यम उद्योगांची वाढ होणे आवश्यक आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लघु व मध्यम उद्योगांच्या विकासासाठी आणि नव्या उद्योग निर्मितीसाठी अनेक चांगले उपाय योजना सुरू केल्या आहेत, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

No comments:
Post a Comment