मोदी हे हतबल पंतप्रधान - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोदी हे हतबल पंतप्रधान - प्रकाश आंबेडकर

Share This
१२ ऑगस्टला आझाद मैदान येथे जनआंदोलन
मुंबई / प्रतिनिधी 8 Aug 2016: गुजरातच्या उना तालुक्यातील मोठा समढीथळा गावातील दलित तरुणांना हिंदुत्वावादी गोरक्षकांनी गाय मारल्याच्या कारणाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सहभागी संघटना आरएसएसच्या असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. दलितांवर अन्याय अत्याचार होत असताना इतके दिवस मौन बाळगून असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर गोळ्या झाडा; पण माझ्या दलित बांधवांवरील हल्ले थांबवा, असे भावनिक आवाहन केले आहे. यावरून मोदी हे हतबल पंतप्रधान असल्याचे स्पष्ट होते. या विरोधात उना दलित अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे येत्या १२ ऑगस्टला आझाद मैदान येथे जनआंदोलन करणार असल्याचे आंबेडकर यांनी जाहीर केले. 

गुजरातमध्ये दलितांवरील अत्याचारांत वाढ होत असून या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मागील महिन्यात गुजरातमधील उना तालुक्यातील दलित समाजातील तरुणांनी मेलेल्या गाईचे कातडे काढल्याने त्यांना गोरक्षकांनी क्रूरपणे बेदम मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये आंदोलन पेटले आहे. मारहाण करणारे गोरक्षक हे आरएसएसचे प्रशिक्षित लोक आहेत. त्यांच्याकडून कितीही मारहाण झाली तरी दिसून येत नाही. शरीराचा कोणताही अवयव फ्रॅक्चर होत नाही, असे प्रशिक्षण त्यांना दिलेले असते. त्यांना अद्यापि अटक झालेली नाही. कारण अशा प्रशिक्षित व्यक्तींना अटक केल्यास आरएसएसची सर्व कारस्थाने बाहेर येतील ही भीती सरकारला आहे. मेलेल्या गाईचे कातडे काढायला त्या दलित तरुणांना बोलावले गेले. कातडे काढूनही झाले नाही, त्या आधीच हिंदुत्ववादी गोरक्षक त्या ठिकाणी पोहचले व त्यांनी क्रूरपणे मारहाण केली. दलितांना मारण्याचे जे प्रकार चालले आहेत ते पॉलिसी पद्धतीने सुरु आहेत. ज्याला मारहाण केली जात आहे त्याला रुग्णालयात नेल्यास त्याच्या अंगावर ना वळ दिसत आहेत ना शरीरात कोणतेही फ्याक्चर दिसत आहे असे आंबेडकर यांनी सांगितले. 

या घटनेनंतर मी त्या ठिकाणी जाऊन संबंधित घटनेची इत्यंभूत माहिती घेतली. त्यावरून हे मारहाण करणारे प्रशिक्षित असून त्यात आरएसएसचा हात आहे. मारहाणीत या तरुणांच्या कानाचे पडदे फाटले आहेत. त्यांना बेदम मारहाण केली आहे. त्यांना अहमदाबाद ते राजकोट असे हलवले जाते आहे. उपचार मात्र होत नाही. महिना होत आला तरी मारहाण करणार्‍यांना अटक झालेली नाही. ज्यांना अटक झाली, ते मारेकरी नाहीत. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही अँड़ आंबेडकर यांनी केला. या घटनेचा गुजरातमध्ये प्रचंड निषेध केला जात आहे. त्यामुळे आता इतक्या दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मुझे गोली मारो,' असे म्हटले आहे. पद व सत्तेची ताकत वापरून अशा मारेकर्‍यांना अटक करण्याऐवजी 'मुझे गोली मारो,' असे म्हणणो ही त्यांची हतबलता आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून धर्मांध हिंदुत्ववादी संघटनांचे गोरक्षेच्या नावाखाली झज्जर, दादरी ते उना आदी दलित-मुस्लिम समाजावर हल्ले देशभर वाढले आहेत. हे अन्याय, अत्याचार आपण कुठपर्यंत सहन करणार, हेच पशुतुल्य मारहाणीचे जीवन आपण जगणार का, आपल्या माणूसपणाच्या आत्मसन्मानासाठी लढण्याची वेळ आली आहे. आझाद मैदानात करण्यात येणार्‍या आंदोलनात सर्व समविचारी लोकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही अँड़ आंबेडकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages