मुंबई - ''आपत्ती व्यवस्थापन कक्ष कसा असावा व तेथील कार्य कसे असावे, याचे एक चांगले उदाहरण म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष असून हा कक्ष इतर राज्यांसाठी निश्चीतपणे रोल मॉडेल आहे.तसेच इतर महानगरांच्या तुलनेत मुंबई महापालिकेने यंदाचा पावसाळा सुयोग्यप्रकारे हाताळला आहे'', असे कौतुकोद्गार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एन. सी. मारवाह यांनी काढले. आपल्या तीन दिवसीय मुंबई दौ-यादरम्यान बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास नुकतीच भेट दिली, त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधतांना मारवाह बोलत होते.
मारवाह यांच्या भेटी प्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मालिनी शंकर, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आय. ए. कुंदन, महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे हे उपस्थित होते. या दौ-यादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाद्वारे करण्यात येणा-या विविध कार्यवाहींबाबत सविस्तर संगणकीय सादरीकरण महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे महेश नार्वेकर यांनी केले. यानंतर मारवाह व मान्यवरांनी परळ परिसरातील महापालिकेच्या शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेला देखील भेट दिली व तेथील कार्यवाहीची माहिती घेतली.
No comments:
Post a Comment