मुंबई, दि. ४ : मुंबई - गोवा महामार्गावरील खड्डे भरणे, रस्त्याची दुरावस्था दूर करणे यांसह इतर आवश्यक कामे कोणत्याही परिस्थितीत येत्या २५ऑगस्टपर्यंत पूर्ण करुन गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी सुसह्य करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रीय महामार्गप्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या महामार्गाच्या पनवेल -इंदापूर टप्प्यासह इतर टप्प्यांच्या कामांना गती देण्यातयावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधानभवनात यासंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल आणि सार्वजनिकबांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील (सार्वजनिक उपक्रम वगळून), पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री प्रविण पोटे - पाटील, रवींद्र वायकर, दीपक केसरकर,माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री भास्कर जाधव, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमारसिंह, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक (तांत्रिक) आर. के. पांडे, मुख्य सरव्यवस्थापक अतुल कुमार, मुख्य सरव्यवस्थापक (महाराष्ट्र) राजीव सिंग,सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) विनय देशपांडे यांच्यासह कोकणातील विविध भागातील आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करताना संपूर्ण रस्त्याचे काम एकाच ठेकेदाराला दिल्यास काम पूर्ण होण्यास विलंब लागेल.त्यामुळे रस्त्याचे टप्पे पाडून त्याप्रमाणे ठेकेदारांची निवड करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत तांत्रिकदृष्ट्या कामे योग्य होतील यावर भर देण्यात यावा,असे त्यांनी सांगितले. पावसाळा आणि गणेशोत्सवातील संभाव्य वाहतूक वाढ लक्षात घेऊन महामार्गाची दर्जेदार दुरुस्ती करणे, रस्ता खड्डामुक्त करणे यावरप्राधान्याने भर देण्यात यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महामार्गाच्या पनवेल - इंदापूर टप्प्यासह इतर टप्प्यांच्या कामांनाही गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले की,भूसंपादनासह इतर बाबींची पुर्तता लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. यादृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकामविभागाने गतिमान कार्यवाही करावी. महामार्गावरील जुन्या पुलांच्या जागी नवीन पूल उभारण्याच्या कामाचाही यात समावेश करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment