फोर्स वन सारख्या सक्षम दलात कोणत्याही हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फोर्स वन सारख्या सक्षम दलात कोणत्याही हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य - मुख्यमंत्री

Share This
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्राकडे फोर्स वन सारखे सक्षम दल असल्यामुळे आपण कोणत्याही हल्ल्यास प्रत्युत्तर देवू शकतो, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत 85 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या फोर्स वन प्रशासकीय इमारत, वसतिगृह, 140 अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गोरेगांव येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, पोलीस महासंचालक सतीश माथूर हे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (NSG) धर्तीवर महाराष्ट्रातही असे स्वतंत्र फोर्स निर्माण करण्याचे ठरले व त्यानुसार ‘फोर्स वन’ची स्थापना करण्यात आली. ‘फोर्स वन’कडे उपलब्ध असलेली आधुनिक शस्त्रात्रे, तंत्रज्ञान आणि जवानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके बघितल्यानंतर जोपर्यंत आपल्याकडे ‘फोर्स वन’ सारखा फोर्स आहे तोपर्यंत आपण कोणत्याही हल्ल्यास प्रत्त्युत्तर देवू शकतो असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करुन ‘फोर्स वन’च्या जवानांचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे कौतूक केले.

हल्ल्याची परिस्थिती नसताना आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग बनून सतत प्रतिकारासाठी सज्ज असलेले फोर्स म्हणजे ‘फोर्स वन’ होय, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीसांना इंग्रजाच्या काळातील घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गेल्या 25 वर्षात पोलीसांसाठी ज्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असतील त्यापेक्षा अधिक सोयीसुविधा या दोन वर्षात शासनाने उपलब्ध करुन दिल्या आहेत. पोलीसांना चांगली घरे व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने विशेष कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीसांना चांगली घरे व सुविधा देण्यासाठी शासन सतत प्रयत्न करीत आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या फोर्स वन प्रशासकीय इमारत, वसतिगृह, 140 अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. पोलीस गृहनिर्माण महामंडळाने या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्हयात पोलीसांसाठी घरे बांधावीत. यासाठी शासन सतत महामंडळाच्या पाठीशी राहील असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. फोर्स वन च्या मुख्यालयाच्या जागेसाठी तेथील आदिवासी पाडयांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या नागरिकांनाही आवश्यक त्या सोयीसुविधा शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येतील.

‘फोर्स वन’च्या आधुनिकीकरणासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या उपलब्ध करुन दिल्या जातील महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी शासन कधीही तडजोड करणार नाही. ‘फोर्स वन’ हे आधुनिकीकरणाचा वापर करुन देशातील सक्षम असे दल बनेल असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘फोर्स वन’च्या प्रशासकीय इमारत, वसतिगृह आणि निवासस्थानांसाठी 98 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याठिकाणी असलेल्या पाडयांचे स्थलांतर करुन ही जागा उपलब्ध करुन दिली आहे. या पाड्यांनाही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages