नाकाबंदीच्या वेळीच वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नाकाबंदीच्या वेळीच वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

Share This
मुंबई - पोलिसांवरील हल्ले रोखण्यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी दखल घेत, नाकाबंदीच्या वेळीच वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करावी. इतर वेळी कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत.
वाहनांची तपासणी, तसेच इतर वाहतूक कारवाई करत असताना पोलीस ठाणे व वाहतूक विभागात समन्वय राहात नाही. त्यामुळे नाकाबंदी लावून मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाईबाबत वाहतूक पोलीस मुख्यालयाकडून एक परिपत्रकच वाहतूक पोलिसांसाठी काढण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार वाहतूक पोलिसांनी कारवाई स्थानिक पोलीस ठाण्याच्या अंमलदारांसमवेत करण्याची सूचना केली आहे.

नाकाबंदी व्यतिरिक्त कोणीही अधिकारी, तसेच अंमलदार कारवाई करताना आढळल्यास अशा अधिकारी अंमलदार व संबंधित विभागाच्या वरिष्ठांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. या संदर्भात मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांना विचारले असता, सर्व वेळी कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, परिपत्रकातील नाकाबंदीशिवाय इतर वेळी कारवाई करू नये, या सूचनेचा नेमका अर्थ दुधे यांना विचारले असता ते सांगू शकले नाहीत.

नवे परिपत्रक काय म्हणतेनाकाबंदी लावताना वाहतूक विभागातील वरिष्ठांनी स्थानिक पोलीस ठाण्याशी समन्वय ठेवून नाकाबंदीच्या वेळा निश्चित करणे आवश्यक आहे. नाकाबंदी ही वाहतुकीच्या ‘पीक अवर्स’मध्ये असणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा, तसेच इतर कायद्यान्वये करावयाची दंडात्मक वा अंमलबजावणी कारवाई ही फक्त नमूद नाकाबंदीच्या वेळीच करण्यात यावी. इतर वेळी कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले आहे.

या परिपत्रकाचे वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, अपर पोलीस आयुक्त यांना पालन करण्याची सूचनाही केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages