रायगडावर शाक्त राज्याभिषकोस हजारो मुस्लीम युवकांची हजेरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रायगडावर शाक्त राज्याभिषकोस हजारो मुस्लीम युवकांची हजेरी

Share This
मुंबई । प्रतिनिधी - रायगड किल्ल्यावर पहिल्यांदाच छत्रपती शिवरायांच्या शाक्त राज्याभिषेकाचा सोहळा शनिवारी कोणताही वादविवाद न होता मोठ्या उत्साहात पार पडला. मराठा सेवा संघाची उपसंघटना असलेल्या छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडने या सोहळ्याचे आयोजन केले होते. या शिवराज्यभिषेक सोहळ्यास राज्यभरातील सुमारे एक हजारपेक्षा अधिक मुस्लीम युवकांनी हजेरी लावली होती.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील होते. छत्रपती शिवरायांनी ६ जून रोजी वैदीक राज्याभिषेक केल्यानंतरही शाक्त राज्याभिषेक केला. कर्मकांड आणि खर्चास फाटा देवून २४ सप्टेंबर रोजी केलेला शाक्त राज्याभिषेक हाच खरा शिवराज्याभिषेक सोहळा असून बहुजन समाजाचा स्वातंत्र्य दिन आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच शिवाजीच्या नावाने राज्य चालवणारी मंडळी महाराजांच्या विचारांविरोधात काम करत असल्याची टिका पाटील यांनी यावेळी केली. महाराजांच्या सैन्यात २५ टक्के मुस्लीम होते, महाराजांचे आरमारप्रमुख तसेच महाराजांचे १३ अंगरक्षक मुस्लीम होते असे स्पष्ट करत मराठा-मुस्लीम एेक्याने महाराष्ट्र राज्य दंगामुक्त झाले आहे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले.

मेघडंबरीसमोर राज्याभिषेकाचा कार्यक्रम पार पडला. सावित्री पूल दुर्घटनेत वाहून गेलेल्या ४२ प्रवाशांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. शिवशाहीरी आणि जिजाऊ वंदाना यावेळी करण्यात आली. अमोल मिटकरी, सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जून तणपुरे, प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे, मुस्लीम ब्रिगेडचे शेख सुभान अली, जमात ए इस्लाम हिंदचे तौफिक अस्लम, ताहीर अली शेख आणि रिपाइंचे किरण खांबे, सत्यशोधक क्रांती दलाचे कॉ. किशोर ढमाले, अ‍ॅड. अनंत दारवटकर आणि प्रा. प्रतिमा परदेशी यांची भाषणे झाली. रायगड परिसरात तुफान पाऊस असतानाही या सोहळ्यास सुमारे दोन हजारांची उपस्थिती होती. रायगड आणि पाचाड परिसरात सुमारे ५०० पेक्षा अधिक चारचाकीय वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी होती.

अतिरेक्याची आवई
६ जून रोजी छत्रपतींचा वैदिक राज्याभिषेक धामधुमीत साजराकरणाऱ्या संघटनांचा आजच्या सोहळ्यास विरोध होता. या सोहळ्यास मुस्लीम युवकांची मोठी हजेरी लागणार होती. ती उपस्थिती राहू नये यासाठी रायगड परिसरात अतिरेकी उतरल्याची अफवा पसरवण्यात आली. परिणामी जिल्हा पोलीस प्रशासनाने रायगड किल्ल्यावर जाणारा पायी मार्ग बंद केला. केवळ रोपवे खुला असल्याने दुपारपर्यंत दोन हजार कार्यकर्त्यांनाच गडावर पोचता आल्याचे संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष सुधीर भोसले यांनी सांगितले

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages