महात्मा फुले जीवनदायी योजनेत ज्येष्ठांच्या समावेशासाठी पाठपुरावा करू - राजकुमार बडोले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महात्मा फुले जीवनदायी योजनेत ज्येष्ठांच्या समावेशासाठी पाठपुरावा करू - राजकुमार बडोले

Share This
मुंबई, दि. 1 : राज्य शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच ज्येष्ठांना सोयीसुविधा मिळण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघ, राज्य ज्येष्ठ नागरिक संघ, हेल्प एज इंडिया यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गिरगाव चौपाटी येथील नाना नानी पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात बडोले बोलत होते. यावेळी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एस.पी. किंजवडेकर, दिगंबर चापके, हेल्प एज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर, राज्य ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय औंधे आदी यावेळी उपस्थित होते.

बडोले म्हणाले की, जगामध्ये भारतीय कौटुंबिक व्यवस्थेबद्दल कौतुक होते. घरातील ज्येष्ठांचा मान मोठा होता. परंतु आज भौतिक सुविधा वाढल्यानंतर ज्येष्ठांबद्दलचा आदर कमी होत आहे. ज्येष्ठांचा सन्मान वाढावा, त्यांना मानाने जगता यावे, यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. परंतु समाजाने यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरणाची कडक अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक परिषदेची स्थापनाही केली आहे. श्रावणबाळ योजनेत ज्येष्ठांच्या निवृत्तीवेतनात एक हजार रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाने तयार केला असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्येष्ठांवरील अत्याचाराची प्रकरणे होऊ नयेत, यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages