नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सदस्य पदांसाठी 15 हजार 827 उमेदवार निवडणूक रिंगणात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 November 2016

नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सदस्य पदांसाठी 15 हजार 827 उमेदवार निवडणूक रिंगणात

147 थेट नगराध्यक्ष पदांसाठी 1 हजार 13 उमेदवारांमध्ये लढत
मुंबई, दि. 19: राज्यात पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या 164 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या 3 हजार 706 जागांसाठी एकूण 15 हजार 827उमेदवार निवडणूक रिंगणात असून 27 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत; तर 147 थेट नगराध्यक्ष पदांसाठी 1 हजार 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपरिषदा व 18नगरपंचायतींच्या (एकूण 165) सार्वत्रिक निवडणुकांसाठी 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार होते; परंतु विविध ठिकाणी 27 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने आणि शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे आता 164 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 3 हजार 706 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सदस्य पदांसाठी दाखल झालेल्या एकूण 24 हजार 191 पैकी 20 हजार 716 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. त्यातील 4 हजार 889 उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात 15 हजार 827 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

सदस्य पदाबरोबरच 147 थेट नगराध्यक्ष पदांसाठी दाखल झालेल्या एकूण 2 हजार 374 पैकी 1 हजार 533 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. त्यातील 520 उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात 1 हजार 13 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. या सर्व ठिकाणी 27 नोव्हेंबरला मतदानानंतर दुसऱ्या दिवशी 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणी होईल, असेही सहारिया यांनी सांगितले.

एक दृष्टिक्षेप
• 164 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान
• सदस्य पदांच्या 3 हजार 706 जागांसाठी लढत
• सदस्य पदांसाठी 15 हजार 827 उमेदवार रिंगणात
• विविध ठिकाणी 27 उमेदवार बिनविरोध
• 147 थेट नगराध्यक्षपदांसाठी लढत
• थेट नगराध्यक्षपदासाठी 1 हजार 13 उमेदवार रिंगणात

Post Bottom Ad