महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बालगृहात साजरी केली भाऊबीज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 November 2016

महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बालगृहात साजरी केली भाऊबीज

मुंबई, दि. 01 : बहिण - भावाचे नाते अधिक दृढ करणाऱ्या भाऊबीजेच्या दिवशी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज माटुंग्याच्या विशेष बालगृहात भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांनी बालकांच्या सानिध्यात राहून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. शिवाय त्यांना भाऊबीजेची भेटही दिली. यावेळी बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे उपस्थित होत्या.
मंत्री पंकजा मुंडे या मागील आठ वर्षापासून अशाच प्रकारे भाऊबीजेचा सण साजरा करीत आहेत. माटुंगा येथील चिल्ड्रन एड सोसायटीच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कुलच्या बालगृहाला आज दुपारी त्यांनी भेट देऊन तेथील बालकांसोबत भाऊबीज साजरी केली. बालकांना दिवाळीचा फराळ, फटाके तसेच क्रिकेट साहित्यासाठी 21 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. त्यांनी बालकांशी संवाद साधला. दोन्ही ताई आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारत आहेत, आवडी निवडी विचारत आहेत, हे पाहून त्या निरागस बालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.

यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, गेल्या आठ वर्षापासून मी राज्यातील विविध ठिकाणी वंचित, उपेक्षित, अनाथ मुलांसोबत दरवर्षी मुलाचा वाढदिवस,स्वतःचा वाढदिवस तसेच भाऊबीज अशा प्रकारे सामाजिक जाणिवेतून साजरी करते. मला यातून आनंद व प्रेरणा मिळते. आजची भाऊबीज ही आठवणीत राहील.

Post Bottom Ad