पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना माहिती खात्यात इंटर्नशिपची संधी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना माहिती खात्यात इंटर्नशिपची संधी

Share This
मुंबई दि.4 : प्रसार माध्यमाच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप (आंतरवासिता) करण्याची संधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने उपलब्ध करुन दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध निर्णयांचे, योजनांची, कार्यक्रमांची प्रसिद्धी विविध प्रसार माध्यमांद्वारे करण्याचे कार्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करीत असते. यासाठी महासंचालनालयाच्या वृत्त शाखा, महान्यूज, प्रकाशने,प्रदर्शने, वृत्तचित्र, माहिती तंत्रज्ञान, संशोधन, आस्थापना तसेच लेखा अशा विविध शाखा कार्यरत आहेत.
इंटर्नशिप करण्याची संधी जनसंवाद, जनसंपर्क, माहिती तंत्रज्ञान, जाहिरात,फाईन आर्टस्, दूरदर्शन कार्यक्रम निर्मिती, चित्रपट निर्मिती यातील पदवी/पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना महासंचालनालय, मुंबई आणि क्षेत्रिय कार्यालयामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या इंटर्नशिप कार्यक्रमाचा कालावधी तीन महिने एवढा असेल. यशस्वीरित्या इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना महासंचालनालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. तथापि, विद्यावेतन लागू नसेल. पूर्वानुभव असलेल्या व उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांची निवड ही प्रवेश परीक्षा/मुलाखतीद्वारे केली जाईल.

उमेदवारांना मंत्रालय अथवा त्यांच्या पसंतीच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या माहिती कार्यालयामध्ये इंटर्नशिप करता येईल. इच्छुकांनी स्वत:चे संपूर्ण नाव, जन्म दिनांक, शैक्षणिक पात्रता, पूर्वानुभव, कुठल्या शाखेत/अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी आंतरवासिता करण्याची इच्छा आहे, स्वत:चा पत्रव्यवहाराचा पत्ता,भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल), पासपोर्ट छायाचित्र, प्रमाणपत्राच्या स्वयंसाक्षांकित प्रती आदीसह महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला,मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई 400 032, दूरध्वनी क्रमांक 022-2202 4961 व ई-मेलrajendra.rane@nic.in या पत्त्यावर दिनांक 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत अर्ज करावा.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages