मुंबई मेट्रो ३ प्रकल्पामुळे रखडलेल्या धारावीतील उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई मेट्रो ३ प्रकल्पामुळे रखडलेल्या धारावीतील उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार

Share This
दादरसह तीन उड्डाणपुलाची होणार डागडुजी
मुंबई : मुंबई मेट्रो ३ च्या कामात अडथळा ठरत असल्याने हाती घेण्यात आलेल्या धारावी येथील शीव-वांद्रे लिंक रोड व संत रोहिदास मार्ग जंक्शन येथील नाल्यावरील उड्डाणपुलाचे काम मागील दोन ते तीन वर्षांपासून रखडले होते.  परंतु, मुंबई मेट्रो ३ साठी उड्डाणपुलाचा सुधारित आराखडा तयार करुन नवीन कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे.  त्यामुळे रखडलेले हे उड्डाणपुल लवकरच मार्गी लागेल असा विश्वास स्थायी समिती अध्यक्ष, यशोधर (शैलेश) फणसे यांनी व्यक्त केला.  याबरोबरच ३ उड्डाणपुलांची डागडुजी आणि घाटकोपर – मानखुर्द जोड रस्त्यावरील विस्तारीत उड्डाणपुलाचेही काम हाती घेण्यात येणार असल्याचीही माहिती फणसे यांनी दिली.

जी/उत्तर विभागातील धारावी येथील शीव-वांद्रे लिंक रोड व संत रोहिदास मार्ग जंक्शन येथील नाल्यावरील पुल खचल्यानंतर येथील पुलाचे काम स्थायी समितीच्या मंजुरीने मे २०१३ रोजी मंजूर करण्यात आले होते.  त्यानुसार पुलाच्या कामाला सुरुवातही करण्यात आली होती.  परंतु, हे काम सुरु असतानाच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यांनी हे पुलाचे काम मेट्रो ३ प्रकल्पाच्या मार्गात बाधित होत असल्याचे सांगत थांबविण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे पुलाचे काम महापालिकेने थांबविले आणि मेट्रो मार्गाला वगळून पुलाचा सुधारित आराखडा बनवला.  यासाठी १० कोटी रुपये अधिक खर्च येणार होता.  ही १० कोटी रुपयांची रक्कम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने महापालिकेकडे जमा केली.  त्यामुळे नवीन आराखडयानुसार पुलाचा खर्च अधिक असल्यामुळे जुन्या कंत्राटदाराकडून काम करुन न घेता नव्याने निविदा मागवून पात्र कंत्राट कंपनीची निवड करण्यात आली आहे.  यासाठी सुमारे १२ कोटी रुपये खर्च करण्यात असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली आहे.

एम/पूर्व विभागामध्ये घाटकोपर - मानखुर्द जोड रस्त्यावर शिवाजी नगर जंक्शन, बैंगनवाडी जंक्शन व देवनार डंपिंग जंक्शनपर्यंतच्या विस्तारीत उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे.  घाटकोपर – मानखुर्द जोडरस्ता हा शीव-पनवेल महामार्ग व पूर्व द्रुतगती मार्ग यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे.  या रस्त्यावर शिवाजीनगर, बैंगनवाडी व देवनार डंपिंग हे तीन महत्त्वाचे जंक्शन आहेत.  पूर्व द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ- चेंबूर लिंक रोड, देवनार डंपिंग मैदान तसेच पूर्व मुक्त मार्ग यावरुन येणाऱया वाहनांमुळे घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते, त्यामुळे हे उड्डाणपूल बनल्यानंतर वाहतुकीची कोंडी कमी होईल.  या पुलाच्या कामासाठी कंत्राट कंपनीची निवड झाली असून यासाठी सुमारे ४७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

परेल टी.टी.सह तीन उड्डाणपुलांची डागडुजी 
परेल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील परेल टी.टी. उड्डाणपूल, सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यावरील पुलाचे तसेच ताडदेव येथील पठ्ठे बापुराव रोड वरील डायना पुलाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष, यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली आहे.  या तिन्ही पुलांच्या डागडुजीसाठी कंत्राट कंपनीची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages