डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांना अनुरुप पालिकेची माहिती पुस्तिका - महापौर स्नेहल आंबेकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांना अनुरुप पालिकेची माहिती पुस्तिका - महापौर स्नेहल आंबेकर

Share This
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महान होते. त्यांच्या विचारांचा देशासह जगावर प्रभाव आहे. त्यांच्या विचारांना अनुसरुन बृहन्मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने प्रकाशित केलेली माहिती पुस्तिका दर्जेदार आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६० वा महापरिनिर्वाण दिन मंगळवार, दिनांक ६ डिसेंबर, २०१६ रोजी असून चैत्यभूमी (दादर) येथे डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतिंना अभिवादन करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल झाले आहेत. या अनुयायांकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या सर्व सेवा-सुविधांची माहिती देणारी पुस्तिका जनसंपर्क विभागाने संकलित केली आहे. या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते शिवाजी पार्क मैदानावरील महापालिकेच्या प्रदर्शन कक्षात आज (दिनांक ५ डिसेंबर, २०१६) सकाळी करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

शिक्षण समिती अध्यक्षा हेमांगी वरळीकर, नगरसेविका समिता कांबळे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे,‘जी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पालिकेचे अधिकारी, चैत्यभूमी येथे दर्शनासाठी आलेले अनुयायी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

महापौर स्नेहल आंबेकर पुढे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव हा जगभर पसरलेला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून डॉ. आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दिनांक १४ एप्रिल, २०१६ रोजी प्रकाशित करण्यात आलेले “युगप्रवर्तक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर” ‘कॉफी टेबल बुक’ सचित्र स्वरुपात असून बाबासाहेब आंबेडकर आणि मुंबई यांचे नाते सांगणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला महान अशी राज्यघटना दिली आहे, त्या घटनेच्या आधारावर हा देश चालतो आहे, असे महापौरांनी नमूद केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्रतिवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध नागरी सेवा-सुविधा अधिकाधिक दर्जेदार पुरविण्याचा प्रयत्न असतो, महापालिका आपले कर्तव्य व बाबासाहेबांच्या प्रती असलेले दायित्त्व म्हणून हे सर्व स्वीकारते. महापालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या या नागरी सेवा-सुविधांचा लाभ अनुयायांनी घ्यावा, असे आवाहन महापौर स्नेहल आंबेकर यांनी शेवटी केले.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मागील तीन महिन्यांपासून कार्यरत आहे. यावर्षी स्नानगृहे, पिण्याचे पाणी यांची संख्या दुप्पटीने वाढविण्यात आली आहे. तसेच ‘बेस्ट’ उपक्रमाकडूनही वाढीव विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. चैत्यभूमी येथे दर्शनासाठी रांगेत उभ्या असणाऱया अनुयायांसाठी उन्हापासून संरक्षणाकरीता छत, पिण्याचे पाणी, बाकडय़ांची व्यवस्था इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिका बाबासाहेबांच्या विविध पैलुंतून बोध घेणारी पुस्तिका आहे. ही पुस्तिका ऐतिहासिक दस्तऐवज असेल, असेही डॉ. दराडे म्हणाल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेले अनुयायी याठिकाणी येतात. बाबासाहेबांनी दिलेले संविधान, बुद्धधम्म, विपश्यना हे आत्मसात करुन या विचारांचे अनुकरण करावे, असेही डॉ. दराडे यांनी शेवटी आवाहन केले. शिवाजी पार्क परिसरात महापालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे उभारण्यात आलेले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र प्रदर्शन’चे उद्घाटनही महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages