पत्रकार संघात उलगडली स्वरलतेची रागदारी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पत्रकार संघात उलगडली स्वरलतेची रागदारी

Share This
मुंबई, दि.22 - वर्षातला सर्वात छोटा दिवस म्हणून आपण ज्याला ओळखतो तो 21 डिसेंबरचा दिवस काल पत्रकार संघात अक्षरशः सुरांच्या वर्षावात न्हाऊन निघाला आणि त्याला निमित्त होते एका अमृत योगाचे! मुंबई मराठी पत्रकार संघाच्या स्थापनेची 75 वर्षे आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कारकीर्दीला यंदाच पूर्ण होत असलेली 75 वर्षे असा योग साधून पत्रकार संघाने, काल आयोजित केलेल्या एका सुरेल मैफिलीत ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित अमरेंद्र धनेश्वर यांनी रागदारीवर आधारित अशी लतादीदींची निवडक मराठी- हिंदी गीतं रागदारीच्या प्रात्यक्षिकासह सादर केली आणि उपस्थित प्रेक्षक सुरांच्या वर्षावात तृप्त झाले!  


उत्तम संगीत समीक्षक आणि त्याचबरोबर उत्तम गायक असा दुहेरी मिलाफ ज्यांच्याबाबतीत साधला गेला आहे असे पंडित अमरेंद्र धनेश्वर यांनी मैफिलीची सुरुवात केली ती अहिर भैरव या प्रातःकालीन रागाने आणि पत्रकार संघाच्या सभागृहाचा माहौलच बदलून गेला. त्या त्या रागाची झलक, त्यातली सौंदर्य स्थळं विषद करून मग पंडित धनेश्वर त्या त्या रागातील लता दीदींचे गाणे ध्वनिफितीच्या रूपाने ऐकवीत गेले आणि रसिकांना लतादीदींच्या गाण्यांचाही नव्याने, अधिक सखोल आस्वाद घेता आला. अहिर भैरवनंतर ललित, तोडी, कलावती, गौड सारंग, हंसध्वनी, धानीसारखा अनवट राग, भीमपलास, मारुबिहाग, शुद्ध कल्याण, दुर्गा, सिने संगीतात मुबलकपणे वापरला गेलेला यमन, मिश्र झिंझोटी  मांड खमाज, शंकर जयकिशन या जोडीने खूप वापरलेला शिवरंजनी, बागेश्री- बहार हा जोड राग, बागेश्री, राग नंद, पहाडी, जयजयवंती आणि शेवटी भैरवी असे एकापाठोपाठ राग त्यांच्या गाण्यांतून उलगडत गेले. अत्यंत वेगवेगळे स्वभाव असलेले, वेगवेगळे चलन असलेले हे राग अडीच तासांच्या कार्यक्रमातून एकापाठोपाठ सादर करणे हे कुणाही गायकासाठी खरे तर आव्हानच. पण श्री धनेश्वर यांनी ते लीलया पेलले आणि संगीत विश्वाची एक धावती सफर रसिकांना घडली. या सफरीत साथ करायला होते ते साक्षातलता मंगेशकर यांचे स्वर्गीय सूर....त्यांची इक था बचपन  (ललित), दे मला तू चंद्रिके (कलावती),अल्ला तेरो नाम (गौड सारंग), जा तोसे नही बोलू कन्हैया (हंसध्वनी), प्रभू तेरो नाम (धानी),मधु मागसी माझ्या (भीमपलास), ये वादा करो चांद के सामने (मारू बिहाग), रसिक बलमा (शुद्ध कल्याण), वृंदावन का कृष्ण कन्हैया (दुर्गा), नववधू प्रिया मी (यमन), कैसे दिन बीते (मिश्र झिंझोटी), आवाज दे के हमे तुम बुलाओ (शिवरंजनी), पवन दिवानी...(बागेश्री) - बहार जोड राग, जन पळभर (मिया की मल्हार), तू जहाँ जहाँ चलेगा (राग नंद), ये सितारों का जमीं पर (पहाडी), मनमोहना बडे झूठे (जयजयवंती) आणि सावरे सावरे (भैरवी) अशी असंख्य मराठी - हिंदी एकल व द्वंद्व गीतं रसिकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली. या गाण्यांबरोबरच त्यांचा इतिहास, त्यांच्या ध्वनीमुद्रणाचे किस्से , संगीत विश्वातल्या काही रंजक गोष्टी या सार्‍यांमुळे हा कार्यक्रम शेवटपर्यंत रंजक झाला. संगीतकार रोशन यांचे सहाय्यक संगीत दिग्दर्शक व उत्कृष्ट मेंडोलीन वादक असलेले किशोर देसाई या वेळी उपस्थित होते. त्यांनीही काही किस्से सांगून या गानसफरीत रंग भरले. धनेश्वर यांना उत्कृष्ट साथ दिली ती तबल्यावर मुक्ता रास्ते, सारंगीवर संगीत मिश्र व तानपुर्‍यावर जयंत नायडू यांनी! अनिल नगरकर यांनी त्या त्या गाण्याबद्दल अधिक माहिती देऊन रसिकांचे उद्बोधन केले.यावेळी आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वृंदा मुंडकुर व अनेक नामवंत उपस्थित होते. 

पत्रकार संघाचे कार्यवाह प्रमोद तेंडूलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर विश्वस्त अजय वैद्य यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमामागची विशद केली. विश्वस्त वैजयंती कुलकर्णी-आपटे, विश्‍वस्त प्रकाश कुलकर्णी, कोषाध्यक्ष दीपक म्हात्रे आणि कार्यकारिणी सदस्य दीपक परब यांनी वादक कलाकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शेवटी संयुक्त कार्यवाह रविंद्र खांडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages