नालेसफाई घोटाळाप्रकरणी मुंबई महापालिकेतील १३ अभियंत्यांवर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2016

नालेसफाई घोटाळाप्रकरणी मुंबई महापालिकेतील १३ अभियंत्यांवर कारवाई

मुंबई : मुंबईमधील नालेसफाई घोटाळय़ात दोषारोप ठेवून निलंबित करण्यात आलेल्या १३ अभियंत्यांवर अखेर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कारवाई केली. नालेसफाईमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाल्यावर याची चौकशी करण्याचे आदेश मेहता यांनी दिले होते. नालेसफाईच्या कामांची चौकशी करणार्‍या कुकनूर समितीच्या अहवालातील अधिकार्‍यांवरील खातेनिहाय कारवाईबाबतच्या शिफारशी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्वीकारून दोषी अभियंत्यांवर कारवाईचे आदेश दिले.

मुंबईमधील नालेसफाई झाली नसल्याचे, नालेसफाईमधील गाळ टाकण्याच्या ठिकाणी गाळ टाकला नसल्याने नालेसफाईच्या कामांची चौकशी सुरु करण्यात आली. चौकशी अहवालानंतर २८0 कोटींच्या कामांचा घोटाळा उघड झाला. चौकशी अहवालात निकृष्ट दर्जाची कामे केल्याचे आढळले. यामध्ये अनियमितता, कामचुकार केल्याचा दोषारोप ठेवून ३२ कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. घोटाळा करणाऱ्या ६ कंत्राटदाराना काळय़ा यादीत टाकले. न्यायालयाच्या सुनावणीनंतर सर्वच्या ३२ कंत्राटदारांना पालिकेने काळ्या यादीत टाकले. कामे थांबवून त्यांची देय रक्कम रोखून ठेवली. मात्र, कंत्राटदारांनी अटक होऊ नये यासाठी न्यायालयात स्थगिती मिळवली.

याच दरम्यान नालेसफाईच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या महापालिकेच्या १४ अभियंत्यांवर दोषारोप ठेवून निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली होती. त्यासाठी कुकनूर समिती नियुक्ती करण्यात आली होती. कुकनूर समितीने चौकशी पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल नुकताच पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर केला. कुकनूर समितीने अहवालात केलेल्या शिफारशी आयुक्तांनी स्वीकारत दोषी अभियंत्यांवर कारवाई केली आहे. १४ अधिकारी आणि अभियंत्यांपैकी मुख्य दक्षता अधिकारी उदय मुरुडकर यांच्यावर यापूर्वीच अटकेची कारवाई झाली असल्याने उर्वरित १३ निलंबित अभियंत्यांवर खातेनिहाय कारवाई करण्यात आली आहे.

कोणत्या अभियंत्यांवर कारवाई प्रशांत पटेल हा दुय्यम अभियंता चौकशीस हजर नसल्याने कार्यमुक्त करण्यात आले. संजीव कोळी, सुदेश गवळी हे दोन सहाय्यक अभियंते व भगवान राणो, प्रफुल्ल वडनेरे, नरेश पोळ या तीन दुय्यम अभियंत्यांना पदावनत ( ज्या पदावर आहेत त्याच्या खालच्या पदावर नेमणूक) केले आहे. सहाय्यक अभियंता रमेश पटवर्धन, प्रदीप पाटील यांना कामांत अनियमितता आढळून आलेल्या कालावधीत १0 दिवसांची सेवा झालेली असल्याने त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात आली आहे. राहुल पारेख, संभाजी बच्छाव हे दुय्यम अभियंत्याची प्रथम नियुक्ती याच पदावर असल्याने त्यांना वेतन श्रेणींच्या निम्नस्तरावर आणले आहे. तसेच मुकादम शांताराम कोरडे यांच्या तीन वेतनवाढी कायमस्वरूपी रोखण्यात आल्या आहेत. यातील दोन कर्मचारी यापूर्वीच सेवानवृत्ती झाल्याने त्यांच्या नवृत्तीनंतरच्या देय रकमेतून प्रत्येकी २५ हजार रुपये वसूल करावे, अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

Post Bottom Ad