नागपूर, दि. 15 : शालेय वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा, व्यवस्थापन आणि वाहतूकदार यांच्यासाठी नवीन नियमावली लवकरच तयार होत असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. सदस्य अनिल भोसले यांनी पुणे शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित नसल्याबाबत तसेच अनेक बसेस विनापरवाना सुरु असल्याबाबतचा प्रश्न विचारला होता.
रावते म्हणाले की, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी 2858 विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांपैकी 1334 वाहनांची पुनर्तपासणी करण्यात आली असून 280 वाहनधारकांनी वाहने तपासणीसाठी सादर न केल्याने त्यांच्या वाहनांची नोंदणी निलंबित करण्याची कार्यवाही सुरु आहे. शालेय मुलांची सुरक्षित वाहतूक करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वाहनात केअर टेकरची नियुक्ती करणे, सीसीटीव्ही बसविणे, पंधरा वर्षे वापरात असलेले वाहन बंद करणे अशा अनेक तरतुदी करण्याच्या दृष्टीने शालेय सचिव आणि परिवहन सचिव यांची एकत्र बैठक घेण्यात येणार असून याबाबत निर्णय घेतले जाणार आहे. या चर्चेत सदस्य शरद रणपिसे, जयंत पाटील यांनी भाग घेतला.