मुंबई : अमर हिंद मंडळाने ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय कबड्डी, लंगडी व खो-खो स्पर्धेचे आयोजन केले आहे. शालेय कबड्डी गटातील मुले आणि मुलींच्या गटात मालाडच्या उत्कर्ष महाविद्यालयाने दुहेरी मुकुट पटकावला मुलांमध्ये न.ा.म. जोशी म्यु. शाळा आणि मुलींमध्ये गौरीदत्त मित्तल यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
कबड्डी स्पर्धेने अमर हिंद मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला सुरुवात झाली. शिवछत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू सुवर्णा बारटक्केच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद््घाटन करण्यात आले. या वेळी आयईएसचे क्रीडा प्रशिक्षक गोसावी, अमर हिंद मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. मुलांच्या अंतिम सामन्यात उत्कर्ष महाविद्यालयाने ना. म. जोशी मार्ग म्यु. शाळेचा ४६-३२ असा १४ गुणांनी पराभव केला. उत्कर्षच्या हर्ष जाधवने उत्कृष्ट चढाई करताना तब्बल २१ गडी बाद केले. हर्ष जाधवचा सहकारी प्रतीक घागने ६ नेत्रदीपक पकड करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. ना. म. जोशीच्या ऋतिक पाटीलने चढाईत ९ गूण वसूल केले. मुलींच्या अंतिम सामन्यात उत्कर्ष महाविद्यालयाने सायनच्या गौरीदत्त मित्तल विद्यालयाचा ५२-२६ असा धुव्वा उडवला. उत्कर्षच्या आरती मत्कंडेने चढाईत २३ गुण वसूल करत ४ पकडी केल्या. गौरीदत्तच्या ऋणाली भुवडने चढाईत १७ गुण मिळवले. मुलांमध्ये गौरीदत्त व शारदाश्रम आणि मुलींमध्ये प्रभादेवी से. हायस्कूल व काळाचौकीच्या शिवाजी विद्यालयाने अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकावला.
कबड्डीनंतर ५ ते ६ जानेवारीदम्यान खो-खो स्पर्धा भरतील. त्यानंतर ७ ते ११ जानेवारी या काळात १८ वर्षांखालील कुमार व मुली मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे, तर याच कालावधीत पुरुष महिला गटाची जोड जिल्हा (मुंबई शहर व मुंबई उपनगर) खो-खो स्पर्धा भरेल.